मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – ऍमेझॉन कंपनीकडे ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मोबाईलच्या पार्सलमध्ये मोबाईलऐवजी डायरी देऊन एका चित्रकाराची फसवणुक केल्याप्रकरणी डिलीव्हरी बॉयला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. निखील राजेंद्र सोनार असे या डिलीव्हरी बॉयचे नाव असून त्याच्याकडून विवो कंपनीचा ८१ हजार ६४९ रुपयांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याने अशाच प्रकारे ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पार्सलमधील महागड्या वस्तू काढून इतर ग्राहकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.
३३ वर्षांचे आकाश शरणपालसिंग ठक्कर हे व्यवसायाने चित्रकार असून ते मालाडच्या एव्हरशाईननगर, मोदी स्पेसस ऑईस्टर अपार्टमेंटमध्ये राहतात. २७ डिसेबरला त्यांनी ऍमेझॉन शॉपिंग ऍपवरुन एक विवो कंपनीचा एक्स २०० प्रो मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. या मोबाईलची किंमत ८१ हजार ६४९ रुपये होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन मोबाईलचे पेमेंट केले होते. दोन दिवसांनी त्यांच्या घरी आलेल्या डिलीव्हरी बॉयने त्यांना मोबाईलचे पार्सल दिले होते. ते पार्सल त्यांनी उघडले असता त्यात मोबाईल नव्हता. बॉक्समध्ये एक डायरी आणि स्टिकर होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ऍमेझॉन कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन ही माहिती दिली होती. यावेळी या कर्मचार्याने त्यांना अद्याप पार्सल डिलीव्हर झाले नसून त्यांच्या सिस्टीममध्ये तशी नोंद आहे. त्यामुळे त्यांनी संबंधित डिलीव्हरी बॉयला फोन केला. त्याने ते पार्सल तुमचे नसून दुसर्या व्यक्तीचे आहे.
काही वेळानंतर त्यांच्याकडे दुसरा डिलीव्हरी बॉय आला आणि त्यांनी त्यांना मोबाईल पार्सल दिले. मात्र ते पार्सल ऍमेझॉन कंपनीचे नव्हते. त्यामुळे त्यांनी ते पार्सल घेण्यास नकार दिला. काही वेळानंतर त्यांना कंपनीकडून त्यांचे पार्सल डिलीव्हर झाल्याचा मेल आला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा कस्टमर केअरला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. यावेळी या कर्मचार्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतो असे सांगून त्यांना शुक्रवार ३ जानेवारीपर्यंत थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना कंपनीकडून एक मेल आला होता. त्यात त्यांना त्यांचे पार्सल व्यवस्थित आणि सुस्थितीत मिळाले आहे. त्यामुळे तुम्हाला कंपनीकडून रिफंड किंवा रिप्लेसमेंट मिळणार नाही असे नमूद केले. मोबाईलऐवजी कंपनीच्या डिलीव्हरी बॉयने पार्सलमध्ये डायरी आणि स्टिकर देऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, पोलीस हवालदार तावडे आणि गोवळकर यांनी तपास सुरु करुन तांत्रिक माहितीवरुन निखील सोनार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच विवो मोबाईल काढून त्याजागी डायरी आणि स्टिकर ठेवल्याची कबुली दिली. या कबुलीनतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. निखील हा गोरेगाव येथील प्रेमनगर, संजय डेअरीजवळील ओम साईनाथ चाळीत राहत असून डिलीव्हरी बॉयचे काम करतो. त्याच्याकडून ८१ हजार ६४९ रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.