सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या वॉण्टेड दोघांना अटक
विविध राज्यातील शंभरहून लोकांची कोट्यवधीची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या दोन वॉण्टेड आरोपींना चेन्नई येथून सायन पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. कार्थिक विश्वनाथन आणि नंदकुमार कुमारन अशी या दोघांची नावे असून पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी काही विदेशी सायबर ठगांच्या संपर्कात होते. या टोळीने विविध राज्यातील सुमारे शंभरहून अधिक लोकांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या सायबर ठगांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विजेंद्र रामेश्वर शर्मा हे भारतीय रेल्वेमध्ये कामाला असून सध्या सायन परिसरात राहतात. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांचा मोबाईलवर व्हॉटअप अकाऊंट आला आणि काही वेळातच मोबाईल बंद झाला होता. त्यानंतर त्यांना दोन दिवसांनी एका अज्ञात मोबाईलवरुन कॉल आला होता. या व्यक्तीने त्यांचे बँकेची माहिती विचारुन तो कॉल बोगस असल्याचे सांगितले. ३० नोव्हेंबरला ते कार्यालयीन कामासाठी उत्तरप्रदेशच्या बनारस येथून लखनऊ असा रेल्वेने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या बँक खात्यातून काही पैसे डेबीट झाल्याचे मॅसेज आले होते. जवळपास १९ मॅसेजमधून त्यांच्या बँक खात्यातून सुमारे एक लाख रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायन पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, पोलीस हवालदार ठोके, पोलीस शिपाई कुंभार, डबडे यांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा तपासादरम्यान सायबर सेल पोलिसांची एक टिम तामिळनाडूच्या चेन्नई शहरात गेली होती. या पथकाने चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत त्यातील दोघांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर कार्थिक विश्वनाथन आणि नंदकुमार कुमारन या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यांना गुरुवारी कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल, सहा सिमकार्ड, तीन डेबीट कार्ड जप्त केले आहेत. फसवणुकीपैकी सत्तर हजाराची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
तपासात ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. या आरोपींनी करंट खाती उघडून ते खाते टेलिग्रामवरुन विदेशी सायबर ठगांना पाठवून वापरण्यास दिले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. त्यांनी आतापर्यंत तीन बँकेत खाती उघडले आहे. त्यात कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाली आहे. राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, कोलकाता, झारखंड, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगणा तसेच इतर राज्यातून शंभरहून अधिक ऑनलाईन तक्रारी सायबर क्राईम पोर्टलवर प्राप्त झाले आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या संपर्कात असलेल्या सायबर ठगांची माहिती मिळाली आहे. या सायबर ठगांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.