मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मार्च 2025
मिरा-भाईंदर-वसई-विरार, – ऑनलाईन फसवणुकीची रक्कम तक्रारदारांना परत करण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. टेलिग्राम टास्कच्या नावाने तक्रारदारांना अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन गंडा घातला होता, मात्र फसवणुकीची रक्कम परत मिळाल्याने त्यांनी तपास अधिकार्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यातील तक्रारदार रमेश विश्वकर्मा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरारोडच्या काशिमिरा परिसरात राहतात. गेल्या वर्षी त्यांना ऑनलाईन टेलिग्राम टास्कच्या नावाने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध टास्क पूर्ण करण्यासाठी सव्वापाच लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र गुंतवणुक रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी 25 ऑक्टोंबर 2024 रोजी सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस निरीक्षक सुजीतकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार फर्नाडिस, पोलीस अंमलदार शुभम कांबळे, सावन शेवाळे, औंकार डोंगरे, मसुब सोमनाथ बोरकर यांनी तपास सुरु केला होता. तपासात त्यांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती, त्यातील तीन बँक खात्याची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर या पथकाने बँक अधिकार्यांशी संपर्क साधून संबंधित तिन्ही बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केलीहोती. त्यामुळे बँकेने या तिन्ही बँक खात्यातील व्यवहार थांबविले होते. फसवणुकीपैकी 1 लाख 86 हजाराची रक्कम नंतर फ्रिज करण्यात आली होती. ही माहिती नंतर लोकल कोर्टात सादर करुन फ्रिज केलेली रक्कम तक्रारदाला परत करण्यात आली होती. त्याचा धनादेश अलीकडेच तक्रारदाराला सोपविण्यात आला होता.