मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – गेल्या 24 तासांत ऑनलाईन फसवणुकीची 1 कोटी 49 लाखांची रक्कम वाचविण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. दिवसभरात 110 हून अधिक गुन्ह्यांतील ही रक्कम असून फ्रिज केलेली रक्कम संबंधित खातेदारांच्या बँक खात्यात लवकरच ट्रान्स्फर केली जाणार आहे. एका दिवसांत इतकी मोठी रक्कम फ्रिज करण्यात यश आल्याने वरिष्ठांकडून संंबंधित सायबर सेलच्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. गुंतवणुक, शेअर ट्रेडिंग, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग, व्हॉटअपद्वारे बोगस प्रोफाईल करुन पैशांची मागणी आदी गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांकडून तक्रारदारांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केली जात होती. याबाबत जनजागृती करुनही फसवणुकीच्या गुन्हे कमी झाले नव्हते. शुक्रवारी 21 मार्चला मुंबई पोलिसांच्या सायबर हेल्पलाईनवर 110 ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाले होते. या तक्रारीत अज्ञात सायबर ठगांनी संबंधित तक्रारदाराच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस हवालदार अभिजीत राऊळ, महिला पोलीस हवालदार प्राजंल वालावलकर,पोलीस शिपाई किरण पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली काकड ंयानी तपास सुरु केला होता. या पथकाने तातडीने एनसीआरपी पोर्टलवर संबंधित तक्रारी दाखल करुन घेतल्या होत्या. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली.
तसेच संबंधित बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची तसेच ती रक्कम खात्यात फ्रिज करण्याची विनंती केली होती. त्यानंतर या नोडल अधिकार्यांच्या मदतीने सायबर पोलिसांना फसवणुकीची 1 कोटी 49 लाख 87 हजार 373 रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले होते. ही रक्कम संबंधित तक्रारदाराच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाणार आहे. ऑनलाईन फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही तासांत सायबर सेल पोलिसांना 1 कोटी 49 लाख रुपयांची रक्कम वाचविण्यात आले आहे.