टास्कच्या बहाण्याने मराठी हास्य कलाकराची फसवणुक

61. 83 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – पार्ट टाईमच्या नावाखाली विविध लिंकला लाईक करण्याचे टास्क देऊन एका मराठी हास्य कलाकाराची अज्ञात सायबर ठगांनी 61 लाख 83 हजाराची ऑनलाईन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन सायबर ठगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक सायबर सेल विभागात फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चांगल्या कमिशनच्या मोहाला बळी पडून या हास्य अभिनेत्याला सायबर ठगांनी चांगलाच दणका दिल्याचे बोलले जाते.

48 वर्षांचे तक्रारदार हास्य कलाकार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहतात. 23 फेब्रुवारीला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अनोळखी व्हॉटअप क्रमांकावरुन एक मॅसेज आला होता. त्यात त्यांना काही लिंकवर लाईक करण्याचे टास्क देण्यात आले होते, या टास्कसाठी त्यांना घरबसल्या कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित लिंक ओपन करुन लाईक केले होते. या टास्कनंतर त्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा झाली होती. त्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. तिथे त्यांच्यासह बॅक खात्याची माहिती घेण्यात आली होती. याच ग्रुपमध्ये त्यांनी दहा टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना अकरा हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर पेड टास्क देण्यात आले होते. त्यात त्यांना आगाऊ रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.

हा टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना गुंतवणुक रक्कमेवर तीस टक्के कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतरही त्यांना तीस टक्क्याप्रमाणे कमिशन मिळत गेले. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला होता. अशाच वेगवेगळ्या टास्कसाठी त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणुक केली होती. ते टास्क पूर्ण झाल्यानंतर त्यांना 27 लाख 51 हजार रुपयांचा प्रॉफिट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र बरेच प्रयत्न करुनही त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता आली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना त्यांच्या टास्कचा क्रेडिट स्कोर 80 झाला असून शंभर टक्के स्कोर झाल्यानंतर त्यांना ही रक्कम काढता येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे शंभर स्कोर पूर्ण करण्यासाठी 19 लाख 70 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. हा स्कोर पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम जास्त झाली असून त्यासाठी त्यांना आधी तीस टक्के रक्कम टॅक्स म्हणून द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी त्याने दिलेली रक्कम त्याला ट्रान्स्फर केली होती.

अशा प्रकारे विविध टास्कसह शंभर टक्के स्कोर होण्यासाठी तसेच सर्व कॅश बॅक खात्यात ट्रान्स्फर होण्यासाठी तीस टक्के टॅक्सची रक्कम असे त्यांनी 61 लाख 83 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही संबंधित व्यक्तींनी त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. तुम्ही टॅक्सची रक्कम दुसर्‍या खात्यात जमा केली असे विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आणखीन पैसे भरण्यास प्रवृत्त केले जात होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तीन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता.

पार्ट टाईमच्या जॉबच्या नावाने या तिघांनी आधी फ्रि आणि नंतर पेड टास्क देऊन त्यांची 61 लाख 83 हजाराची फसवणुक केली होती. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पथकाने तपास सुरु केला असून ज्या ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्याची माहिती काढली जात आहे. या गुन्ह्यांत लवकरच संशयित आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page