मुंबईत लिंक ओपन करुन पैसे सौदी अरेबियात डेबीट झाले
सायबर ठगाचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलकडून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मे 2025
मुंबई, – घरचा पत्ता अपडेटचा करण्याचा मॅसेजसह भारतीस पोस्टाची लिंक पाठवून एका स्टॉक ब्रोकर व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने 2 लाख 35 हजार 555 रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मुंबईत लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डची रक्कम सौदी अरेबियात डेबीट झाली आहे. अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुकीचा मुंबई शहरात घडलेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याचा संमातर तपास सायबर सेलकडून सुरु आहे.
धर्मिल हेमंत वोरा हे 42 वर्षांचे तक्रारदार घाटकोपर परिसरात राहतात. त्यांचा स्टॉक मार्केटचा व्यवसाय असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्याकडे एका खाजगी बँकेचे क्रेडिट कार्ड असून या कार्डवरुन देश-विदेशात व्यवहार करण्याची सुविधा आहे. बुधवारी 14 मेला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन मॅसेज आला होता. त्यात त्यांना त्यांच्या घरच्या पत्ता अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. या मॅसेजमध्ये भारतीय पोस्टाची एक लिंक होती.
ती लिंक भारतीय पोस्टाची असल्याची समजून त्यांनी ती लिंक ओपन करुन त्यात घरचा पत्ता अपडेट केला होता. यावेळी त्यांना 25 रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन 25 रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी त्यांना दोन ओटीपी क्रमांक आले होते. ते ओटीपी क्रमांक अपलोड केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन सौदी अरेबिया या देशात एसएआर या चलनामध्ये दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते. या दोन्ही व्यवहारातून त्यांच्या क्रेडिट कार्डवुरन 2 लाख 35 हजार 555 रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज आला होता. हा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आले.
अज्ञात व्यक्तीने बोगस लिंक पाठवून त्यांना घरचा पत्ता अपडेटसह 25 रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार पंतनगर पोलिसांना सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुंबईत लिंक ओपन करुन पैसे सौदी अरेबियात डेबीट झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.