फोटोशूटरसाठी मुलीची निवड झाल्याची बतावणी करुन फसवणुक
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी बंधूंना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – एका नामांकित कपड्याच्या कंपनीच्या फोटोशूटसाठी तुमच्या दहा वर्षांच्या मुलीची निवड झाल्याची बतावणी करुन तिच्या आईची ऑनलाईन फसवणुक करणार्या कटातील दोन वॉण्टेड आरोपी बंधूंना बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अंधेरी येथून शिताफीने अटक केली. जयकिशन ओमप्रकाश सिंग आणि भगतसिंग ओमप्रकाश सिंग अशी या दोन्ही आरोपी बंधूंची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी बंधू रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यातील जयकिशनवर रत्नागिरीच्या दापोली शहरात हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
चार्मी विरल पारेख ही महिला बोरिवली परिसरात राहते. तिचे पती स्टॉक मार्केटमध्ये काम करतात तर तिची दहा वर्षांच मुलगी शिक्षण घेते. तिने तिच्या मुलीचे काही फोटोशूट करुन ते फोटो विविध कंपन्यांना प्रसिद्धीसाठी दिले होते. 26 मार्च 2025 रोजी तिला जयकिशन सिंग नावाच्या एका व्यक्तीने तिच्य मुलीची फोटोशूटसाठी निवड झाल होती. त्यासाठी प्रोसेसिंग फी, तिचे कपडे, स्टुडिओ इंट्री फी, कुरिअर फी आणि इतर कामासाठी पैसे भरावे लागतील. शूटींग पूर्ण होताच तिला तिचे सर्व पैसे मिळतील असे सांगितले होते. त्यासाठी तिने त्याला ऑनलाईन 28 हजार 547 रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते.
ठरल्याप्रमाणे 19 एप्रिलला ती तिच्या मुलीसोबत गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये गेली होती. मात्र तिथे कुठेही शूटींग सुरु नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने जयकिशनला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा कॉल बंद येत होता. कपड्याच्या शूटींगसाठी जयकिशनसह अन्य एका आरोपींनी तिची ऑनलाईन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी जयकिशन आणि भगतसिंगया दोघांनाही मालपा-डोंगरी, वसंत हॉटेल परिसरात शिताफीने ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही फसवणुक केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तपासात ते दोघेही सख्खे बंधू असून सध्या अंधेरीतील मालपा-डोंगरी क्रमांक तीन, आझाद रोड, इंदुस सिंग चाळीत राहतात. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
यातील जयकिशनवर रत्नागिरीच्या दापोली पोलीस ठाण्यात 2023 रोजी हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध संगमनेश्वर, एमआयडीसी आणि अंधेरी पोलीस ठायात रॉबरीसह इतर गुन्ह्यांची नोंद आहे तर भगतसिंग याच्याविरुद्ध मेघवाडी, एमआयडीसी, अंधेरी पोलीस ठाण्यात ड्रग्जसही, अपहार, फसवणुकीसह आयटीच्या गुन्ह्यांची नांद आहे. फसवणुकीसाठी त्यांनी ज्या बँक खात्याचा वापर केला होता, त्या बँक खात्याचा नवी मुंबई न्हावाशेवा, तेलंगणाच्या राचकोंडा, कोईमंब्तुर, तंबराम पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांत वापर झाल्याचे तपासात उघडकीस आले. नॅशनल सायबर पोर्टलवर पोलिसांना ही माहिती प्राप्त झाली आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.