निवृत्त पोलीस उपमहानिरीक्षकाच्या नातीची फसवणुक

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 जून 2025
मुंबई, – पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या एका माजी पोलीस अधिकार्‍याच्या नातीची दोन अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिपक पवार आणि राजेंद्रसिंग शेखावत नाव सांगणार्‍या दोन्ही सायबर ठगाविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जयसूर्या राजलिंगम संगम हे 79 वर्षांचे वयोवृद्ध चेंबूर येथे राहत असून ते पोलीस खात्यातून पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या मालकीचे हैद्राबादच्या सिंकदाबाद येथे एक फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्यांना भाड्याने द्यायचे होते, त्यासाठी त्यांनी फ्लॅटची जाहिरात एका सोशल साईटवर दिली होती. संपर्कासाठी त्यांनी त्यांच्या नातीचा मोबाईल क्रमांक दिला होता. 18 जूनला तिला एका व्यक्तीने फोन करुन त्याचे नाव दिपक पवार असल्याचे सांगून तो सीआयएसएफमध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्याने त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, आयडी कार्ड पाठवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला भाड्याने फ्लॅटची गरज असल्याचे सांगून तिच्याकडे फ्लॅटचे फोटो मागितले होते. त्यामुळे तिने त्याला व्हॉटअपवर फ्लॅटचे फोटो पाठविले होते.

फ्लॅटसाठी त्यांनी 75 हजार डिपॉझिट आणि 25 हजार भाडा असे जाहिरातीमध्ये नमूद केले होते. मात्र भाड्याची रक्कम जास्त असल्याने त्याने 22 हजार रुपये भाडे आणि 75 हजार डिपॉझिट देण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी तिने त्याची मागणी मान्य केली होती. त्यानंतर त्याने त्यांचे सर्व पेमेंट हाऊस रेंटमधून दिले जाते. त्यासाठी त्यांना त्याचे वरिष्ठ राजेंद्रसिंग शेखावत कॉल करतील असे सांगितले. त्यानंतर तिला दुसर्‍या क्रमांकावरुन एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो राजेंद्रसिंग बोलत असल्याचे सांगितले. त्याने तिला पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी शहानिशा करण्यासाठी आधी बावीस हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. तिला गुगल पे अ‍ॅप ओपन करण्यास सांगून तिची बँक खात्याची माहिती ओपन करण्यास सांगितली. त्यानंतर तिच्याकडून बँक खात्याची माहिती घेऊन तिच्या बँक खात्यातून 22 हजार रुपये डेबीट केले होते.

पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच तिला हा फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार जयसूर्या संगम यांना सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर जयसूर्या संगम यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिपक पवार आणि राजेंद्रसिंग शेखावत नाव सांगणार्‍या दोन्ही सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page