महिला व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक
विविध गुन्ह्यांत अटकेची भीतीची दाखवून 27 लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 सप्टेंबर 2025
मुंबई, – भायखळा येथे राहणार्या एका महिला व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आधारकार्डचा गैरवापर करुन विविध बँकेत खाती उघडण्यात आले असून या खात्यांचा मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत वापर झाला आहे. त्यांच्या नावाने सिमकार्ड घेण्यात आले असून त्यात अनेकांचे मानसिक शोषण करण्यात आले असून त्यांचा मानवी तस्करीमध्ये सहभाग असल्याचा आरोप करुन या ठगाने तिला अटकेची कारवाईची भीती दाखवून सुमारे 27 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तक्रारदार व्यावसायिक महिलेच्या तक्रारीवरुन मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
कोनिका निर्मल शाह ही महिला भायखळायेथे राहते. ती व्यवसायिक सल्लागार म्हणून काम करत असून तिचे काम तिच्या घरातून चालते. 18 ऑगस्टला ती तिच्या घरी असताना तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. तिचा मोबाईल क्रमांक दोन तासांत ब्लॉक होणार असल्याचे सांगून त्याने तिचा कॉल दुसर्या व्यक्तीला ट्रान्स्फर केला होता. यावेळी समोरुन बोलणार्या प्रिया शर्मा या महिलेने तिला तिच्या आधारकार्डचा कोणीतरी गैरवापर केला आहे. या आधारकार्डवरुन सिमकार्ड घेण्यात आले असून या सिमकार्डवर आतापर्यंत पोलिसांना सोळा तक्रारी प्राप्त झाले आहेत. तिच्या सिमकार्डवरुन काहीचे मानसिक शोषण झाल्याचे सांगून तिला पोलिसांकडू एनओसी घ्यावी लागेल, नाहीतर तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला जाईल. त्यानंतर तिला अन्य एका व्यक्तीने कॉल करुन त्याने तिला अंधेरी पोलीस ठाणयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
यावेळी तिने पोलीस ठाण्यात येण्यास नकार देत तिची ऑनलाईन चौकशी करण्याची विनंती केली. त्यानंतर या व्यक्तीने तिला व्हिडीओ कॉल केला. यावेळी तिला समोर एक पोलीस अधिकारी गणवेशात दिसला होता. त्याने तिचे आधारकार्ड दाखवून तिच्या आधारकार्डवरुन तेरा अनधिकृत बँक खाती उघडण्यात आले, मानवी तस्करीसह मनी लॉड्रिंग झाल्याचे सांगून तिच्याविरुद्ध केस क्रमांक 19291 झाला आहे. या गुन्ह्यांत मोहम्मद जुनैद अख्तर नावाचा एक मुख्य आरोपी असून तिचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे तिला पोलिसांनी एनओसी मिळणार नाही. त्यानंतर तिच्या गुंतवणुकीसह बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या बँक खात्याची चौकशी होणार असून बँकेतील सर्व कॅश एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले.
चौकशी संपताच तिला तिची संपूर्ण रक्कम परत मिळेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याने दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने 27 लाख रुपये पाठविले होते. मात्र नंतर तिला तिची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने घडलेला प्रकार मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या सर्व बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.