पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन वयोवृद्धाची फसवणुक
सदानंद दातेंच्या नावाने 70 लाख ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – पहलगाम दशहतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार परळ परिसरात उघडकीस आला आहे. आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाचा उल्लेख करुन सायबर ठगाने वयोवृद्धाला त्यांच्या बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात सुमारे 70 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले आहे. फसवणुकीसाठी पहिल्यांदाच सायबर ठगांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भांचा वापर झाल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी विनिता शर्मा, प्रेमकुमार गौतम आणि सदानंद दाते नाव सांगणार्या तीन तोतया सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तूहीनकुमार सलीलकुमार मुखर्जी हे 73 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत परळ येथे राहतात. ते वरळीतील आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीतून मॅनेजिंग डायरेक्ट म्हणून निवृत्ती झाले आहेत. सध्या ते एका खाजगी कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहतात. 25 सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात महिलेचा कॉल आला होता. तिने तिचे नाव विनिता शर्मा असल्याचे सांगून ती दिल्लीतील एटीएस कंट्रोल रुममधून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम येथे झालेल्या दशहतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्ली एटीएसने मुंबई शहरात काही ठिकाणी छापे टाकून कारवाई केली होती. त्यात काही लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यात मोठमोठे बिल्डर्स, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकार्यासह त्यांचा नावाचा समावेश आहे. पहलगामच्या दशहतवाद्यांना त्यांनी मदत केल्याचे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एटीएस कार्यालयता चौकशीसाठी यावे लागणार असल्याचे सांगितले. त्यांनी तपासात सहकार्य केले नाहीतर त्यांचे सर्व बँक खाते फ्रिज होतील अशी धमकी दिली होती.
या महिलेने या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआरएचे दिल्लीतील तपास अधिकारी आणि आय प्रेमकुमार गौतम हे करत आहेत असे सांगितले. त्यानंतर त्यांना सतत तीन ते चार अज्ञात व्यक्तींकडून कॉल येत होते, मात्र त्यांनी कोणाचेही कॉल घेतले नाही. याच दरम्यान त्यांना एक व्हिडीओ कॉल आला होता. यावेळी त्यांना समोर एक 40 वर्षांचा व्यक्तीचा आयपीएस दर्जाचा पोलीस युनिफॉर्म घातलेला व्यक्ती दिसला. त्याने स्वतचे नाव प्रेमकुमार गौतम असल्याचे सांगून त्यांची पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्यांचा मनी लॉड्रिंगमध्ये सहभाग उघडकीस आला आहे. तुमचे जीवन धोक्यात असून तुमच्या प्रत्येक हालचालींवर आमची नजर असल्याचे सांगितले. तसेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले असून त्यांना अरेस्ट वॉरंटचा मोबाईलवरुन फोटो दाखविला होता. तुमचे सर्व बँक खाते बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचे बायोडाटा, पॉलिटिकल आयडीओलॉजी हे सर्व लिहून त्यांचे बॉस सदानंद दाते यांना पाठवा असे सांगितले. त्यांच्यासोबत कोण कोण राहते, त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स पाठवण्यास सांगितले.
या संपूर्ण घटनेने तूहीनकुमार मुखर्जी हे प्रचंड घाबरले होते. भीतीपोटी त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसर्या दिवशी त्यांना अन्य एका व्यक्तीने कॉल करुन ते आयपीएस अधिकारी सदानंद दाते बोलत असलचे सांगितले. त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका बँक खात्यात 77 लाख, दुसर्या बँक खात्यात सव्वादोन लाख, तिसर्या बँक खात्यात 65 हजार, चौथ्या बँक खात्यात 94 हजार, पाचव्या बँक खात्यात नऊ लाख, लंडनच्या बँक खात्यात 75 डॉलर तसेच एक कोटी आठ लाखांची एफडी तसेच स्टॉक मार्केटमधील पंधरा कोटीची गुंतवणुकीची माहिती दिली होती. यावेळी सदानंद दाते नावाने बोलणार्या व्यक्तींनी ती माहिती त्यांना डिटेल शीट बनवून पाठविण्यास सांगितले.
तुमचे पैसे व्हाईट आहे का याची चौकशी होणार आहे. तोपर्यंत त्यांना बॅकेतून कुठलाही व्यवहार करता येणार नाही असे सांगतले. त्यानंतर त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याच्या सांगण्यावरुन संबंधित बँक खात्यात टप्याटप्याने सत्तर लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळेल असे सांगितले. ही चौकशी सुरु असताना त्याने त्यांना त्यांच्या एफडीची रक्कम काढून त्याला पाठविण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला.
यावेळी पोलिसांनी त्यांना कारवाईच्या नावाने कुठलीही तपास यंत्रणा पैशांची मागणी करत नाही. त्यांची अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना संबंधित विनिता शर्मा, प्रेमकुमार गौतम आणि सदानंद दाते नाव सांगणार्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांत सीबीआय, ईडी, पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृद्ध टार्गेट केले जात होते. आता सायबर ठगांनी फसवणुकीसाठी पहलगामच्या नावाने फसवणुक केली आहे. अज्ञात सायबर ठगांनी पहिल्यांदाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन अशा प्रकारे एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याची मुंबईची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.