क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने फसवणुक

दूतावास कार्यालयातील अधिकार्‍याच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून मलेशिया दूतावास कार्यालयातील एका अधिकार्‍याची सायबर ठगाने सुमारे 79 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी दहा अज्ञात सायबर ठगाविरुद्ध कट रचून फसवणुक करणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीनंतर तक्रारदार मानसिक तणावात गेले होते, त्यामुळे त्यांनी दिड वर्षांनंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

41 वर्षांचे तक्रारदार कांजूरमार्ग परिसरात राहत असून सध्या मलेशिया दूतावास कार्यालयात इमिग्रेशन कर्मचारी म्हणून कामाला आहे. त्यांचे वांद्रे येथील टर्नर रोडवरील नोटन प्लाझामध्ये कार्यालय आहे. जानेवारी 2024 रोजी ते त्यांच्या कार्यालयात काम करत होते. यावेळी त्यांचा मोबाईल क्रमांक ईजी प्लान या खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. त्यांना शेअर ट्रेडिंगची थोडीफार माहिती होती. त्यामुळे त्यात दिलेली माहिती खरी असल्याचे त्यांना दिसून आले होते. काही दिवसांनी त्यांना ग्रुप अ‍ॅडमिन मयती गुप्ता आणि अर्जुन सिंह यांनी कॉल करुन त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती सांगून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर त्यांच्या नावाची नोंदणी केली होती.

त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी अठराहून अधिक वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यापैकी 1 लाख 69 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला होता. यावेळी त्यांच्यासह इतर अधिकार्‍यांनी त्यांना आणखीन रक्कम गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी एप्रिल 2024 ते जून 2025 या कालावधीत सुमारे 78 लाख 85 हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी ग्रुप अ‍ॅडमिन मयती गुप्ता आणि अर्जुन सिंह यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली.

यावेळी या दोघांनी त्यांना ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांना 18 लाख रुपये जमा करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी ती रक्कम जमा करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्क बंद केला होता. क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल असे सांगून या दोघांसह इतर आठजणांनी त्यांना 78 लाख 85 हजार रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. त्यांना मूळ रक्कमेसह प्रॉफिटची रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली होती. या प्रकारामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. समाजात बदनमाी होईल म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही किंवा याबाबत कोणालाही काहीही माहिती सांगितली नाही.

अलीकडेच त्यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना घडलेला प्रकार सांगितला होता. यावेळी त्यांना बँकेच्या अधिकार्‍यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित दहा सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कट रचून फसवणुक करणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केल्याने या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page