मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – बँक खात्यासह डेबीट कार्ड व ओटीपी क्रमांक कोणालाही शेअर केला नसताना अज्ञात सायबर ठगांनी एका वयोवृद्धाच्या बँक खात्यातून सुमारे साडेआठ लाखांचा ऑनलाईन व्यवहार करुन फसवणुक केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दिडोंशी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.
६३ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार दहिसर येथे राहत असून गोरेगावच्या एका खाजगी कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. ३१ मेला त्यांच्या मोबाईलवर व्होडाफोन कंपनीकडून ऍप लॉगीन करण्यासाठी एक ओटीपी आला होता. दुसर्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर सिमकार्ड हरविल्याचा एक मॅसेज आला होता. त्यामुळे ते मोबाईल गॅलरीत गेले होते. तिथे त्यांना त्यांच्याकडूनच सिमकार्ड बंद करण्याबाबत विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी तशी कुठलीही विनंती केली नसल्याचे सांगून त्यांना दुसरे सिमकार्ड देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना कंपनीने दुसर्या सिमकार्ड दिले होते. ३ जून ते त्यांच्या कंपनीत काम करत होते. यावेळी त्यांना एका व्यक्तीला ऑनलाईन पेमेंट करायचे होते. ते नेटबँकिंगद्वारे पैसे ट्रान्स्फर करत असताना त्यांना त्यांच्या खात्यातून सव्वापाच लाख रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज आला होता. हा मॅसेज पाहत असताना त्यांना दुसरा मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ३१ हजार रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. सहा ऑनलाईन व्यवहार करुन ८ लाख ५६ हजाराची ही रक्कम विशालकुमार नावाच्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँकेत जाऊन तक्रार केली होती. त्यांनी कोणालाही त्यांच्या बँक खात्याची माहितीसह ओटीपी शेअर केला नव्हता. तरीही त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम डेबीट झाली होती. यावेळी बँकेने तपास करुन त्यांना माहिती दिली जाईल असे सांगितले. १५ जूनला बँकेने त्यांना मेलद्वारे तुमचा ओटीपी व्हॅलिड असून तो तुम्हीच शेअर केला आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे रिफंड मिळणार नाही असे सांगून अंग काढून घेतले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.