ओटीपी शेअर केला नसताना 27 लाखांची ऑनलाईन फसवणुक

कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही शेअर केला नसताना एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या क्रेडिट कार्डवरुन सुमारे 27 लाख रुपयांचा ऑनलाईन व्यवहार झाल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अ‍ॅमेझॉनवरुन आलेली वस्तू परत करताना या ठगाने त्यांना कॉल करुन मोबाईल हॅक करुन ही फसवणुक केली होती. आरोपींचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

रमीज रियाज बागवान हे कन्स्ट्रक्शन व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरी परिसरात राहतात. त्यांचे एका खाजगी बँकेत खाते असून दुसर्‍या बँकेचे त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. या कार्डवरुन ते नेहमी ऑनलाईन शॉपिंग करतात. 14 फेब्रुवारीला त्यांनी अ‍ॅमेझॉनवरुन एक वस्तू ऑर्डर केली होती, मात्र ती वस्तू न आवडल्याने त्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. 23 फेब्रुवारीला दुपारी सव्वाच्या सुमारास त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो अ‍ॅमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी घेतलेल्या वस्तूसह पेमेंटची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला हाता.

ही माहिती शेअर करताना त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आला होता. हा ओटीपी त्यांनी कोणालाही शेअर केला नव्हता. तरीही त्यांच्या मोबाईलवर काही वेळात बँकेचे काही मॅसेज येऊ लागले होते. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन 27 लाख 75 हजार 480 रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या ठगाने त्यांचा मोबाईल हॅक करुन मोबाईलमधील बँकेची माहिती प्राप्त करुन ही फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला ही माहिती सांगून त्यांचा क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर विभागासह आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page