व्यावसायिकासह पत्नी व मुलीच्या बँक खात्यातून 23 लाखांचा अपहार

बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन मोबाईल हॅक करुन गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मार्च 2026
मुंबई, – वयोवृद्ध व्यावसायिकासह त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या बँक खात्यातून सुमारे 23 लाखांचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल हॅक करुन ही फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

कैलासनाथ कृष्णचंद हर्ष हे 85 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत गोवंडीतील देवनार परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे. त्यांच्यासह पत्नी आणि मुलीचा एका नामांकित बँकेत खाते आहे. 10 मार्चला ते त्यांच्या घरी होते. सकाळी साडेनऊ वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने तो त्यांच्या बँकेतून बोलत असून त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाले आहे. त्याचीच त्याच्याकडून शहानिशा केली जात आहे असे सांगितले. त्याने त्यांना कॉल चालू ठेवण्यास सांगितले.

जवळपास 34 मिनिट त्यांचा कॉल सुरुच होता, मात्र समोरील व्यक्तीने त्याचा कॉल बंद केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच काही वेळाने त्यांनी बँक मॅनेजरला कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून काही ट्रान्झेंशन झाले आहेत का याबाबत विचारणा केली. यावेळी बँक मॅनेजरने त्यांच्या बँक खात्याची माहिती काढली असता त्यात 7 लाख 99 हजार 966 रुपयांचे ऑनलाईन ट्रान्झेंशन झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन ट्रान्झेंशन झाल्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्याची पाहणी केल्यांनतर पत्नीच्या बँक खात्यातून 4 लाख 99 हजार 510 तर मुलीच्या बँक खात्यातून 9 लाख 86 हजार 686 रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले.

संबंधित व्यवहार होताना त्यांच्या मोबाईलमध्ये काही ओटीपी आले होते, मात्र त्यांनी ते ओटीपी कोणालाही शेअर नव्हते. तरीही त्यांच्या तिन्ही बँक खात्यातून 22 लाख 85 हजार 679 रुपये इतर बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळविण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच कैलासनाथ हर्ष यांनी पूर्व सायबर सेल पोलिसांना घडलेला सांगितला. या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता,

प्राथमिक तपासात त्यांच्याशी बँक कर्मचारी असल्याची बतावणी करणार्‍या व्यक्तीने त्यांचा मोबाईल हॅक केला होता. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात आहे. संबंधित फ्रॉड बँक खात्याची सर्व व्यवहार गोठविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page