अटकेच्या कारवाईची धमकी देत ऑनलाईन फसवणुक
एमटीएनएलच्या निवृत्ती सिव्हील इंजिनिअरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – अटकेच्या कारवाईची धमकी देत अज्ञात सायबर ठगांनी सुमारे आठ लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमटीएनएलच्या ७५ वर्षांच्या वयोवृद्ध सिव्हील इंजिनिअरच्या तक्रार अर्जावरुन विलेपार्ले पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राज कुंद्रा याच्या घरावरील छाप्यात त्यांच्या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आल्याचे कागदपत्रे सापडल्याचा आरोप करुन त्यांच्यावर मनी लॉड्रिंगसह अन्य प्रकरणात कारवाईची धमकी दिली होती. याच गुन्ह्यांत अटकेची धमकी देऊन ही फसवणुक करण्यात आली होती.
७५ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अनिल काशिनाथ भागवत हे विलेपार्ले परिसरत राहत असून ते महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) मधून सिव्हील इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले आहेत. १० ऑगस्टला ते त्यांच्या घरी होते. सकाळी अकरा वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुनतो डीओटी विभागाातून बोलत आहे. त्यांच्या आधारकार्डवरुन एक नवीन सिमकार्ड विकत घेण्यात आले आहे. या सिम क्रमांकावरुन अनेकांना अश्लील मॅसेज पाठविले जात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक इंटरनेट ब्लॉक केला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या आधारकार्डवरुन कुठलाही नवीन सिमकार्ड घेतला नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरील व्यक्ती त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने त्यांचा कॉल पोलीस विभागात ट्रान्स्फर करतो असे सांगून आता पोलिसांशीच बोला असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी अन्य एका व्यक्तीने संभाषण सुरु केले. त्याने तो अंधेरीतील क्राईम ब्रॅच विभागातून बोलत असल्याचे सांगून त्याने त्यांना त्यांच्या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आले आहे. राज कुंद्रा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यात त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स सापडले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचे नाव समो आले असून त्यांच्याविरुद्ध कुठल्याही क्षणी अटक वॉरंट निघेल. आमचे साहेब उद्या येतील. या वॉरंटवर त्यांची सही झाली की तुमच्यावर अटकेची कारवाई होईल. त्यानंतर त्यांना दहा दिवस जेलमध्ये राहावे लागेल, तुम्हाला जामिन मिळणार नाही अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर ते प्रचंड घाबरले. बदनामीच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
दोन दिवसांनी त्यांना एका व्हॉटअप कॉल आला होता. या व्यक्तीने त्यांना दुपारपर्यंत तुम्हाला अटक होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मदत करावी अशी विनंती केली. या व्यक्तीने ते सर्वोच्च न्यायालयाच्या मनी लॉड्रिंग विभागातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडे त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना दिलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सागितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून विविध बँक खात्यात आठ लाख पाच हजार रुपये पाठवून दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांची एफडी मोडली. ही रक्कम पाठविल्यानंतर त्याने प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न करतो असे सांगून फोन बंद केला. घडलेला प्रकार नंतर त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितला. यावेळी त्यांच्या मुलीने अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा विलेपार्ले पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.