मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन एका आर्टिस्टची बदनामी करुन व्हिडीओ डिलीटसाठी लिंक पाठवून अज्ञात सायबर ठगाने सुमारे एक लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी संबंधित अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.
३७ वर्षांचा तक्रारदार आर्टिस्ट असून तो अंधेरीतील ओल्ड म्हाडा परिसरात राहतो. ३१ ऑगस्टला त्याला प्रिया पटेल या महिलेच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ आला होता. त्यात त्याच्या चेहरा मॉर्फ करुन अज्ञात व्यक्तीने अश्लील व्हिडीओ बनवून त्याची सोशल मिडीयावर बदनामी केली होती. या प्रकारानंतर त्याला धक्काच बसला होता. त्याचा अश्लील व्हिडीओ विविध सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याच दरम्यान त्याला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन त्याचा अश्लील व्हिडीओ डिलीट करायचा आहे का अशी विचारणा केली होती. या व्हिडीओमुळे त्याची प्रचंड बदनामी होत असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीला व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याने त्याला एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्याची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार होऊन एक लाख रुपये डेबीट झाले होते.
अज्ञात व्यक्तीने अश्लील व्हिडीओ डिलीट करण्याचे आमिष दाखवून त्याला लिंक पाठवून त्याच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याने वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अज्ञात ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.