फुटबॉल कोचला दहा लाखांना गंडा घालणार्या दुकलीस अटक
टास्कच्या माध्यमातून जास्त पैसे मिळण्याच्या बहाण्याने फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – प्रॉफिट टास्कवर जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका फुटबॉल कोचला सुमारे दहा लाख रुपयांना गंडा घालणार्या दुकलीस अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. अतुल रमेशभाई वालचूर आणि जयेश आररिसभाई प्रजापती अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीच्या अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत या दोघांनाही यापूर्वीही पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
२८ वर्षांचे तक्रारदार फुटबॉल कोच असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. १६ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना नेहा नाव सांगणार्या एका तरुणीचा मॅसेज आला होता. तिने तिच्या कंपनीकडून त्यांना पार्टटाईम जॉब ऑफर देताना त्यांना घरबसल्या चांगले पैसे कमविण्याची संधी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. होकार दिल्यानंतर तिने त्यांना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राय करण्यास सांगितले होते. त्याचे स्क्रिनशॉट पाठविल्यानंतर त्यांना कमिशनची रक्कम मिळणार होती. त्यानंतर त्यांना एका टेलिग्रामची लिंक पाठवून टेलिग्राम जॉईन होण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये दिलेले सर्व टास्क पूर्ण केल्यांनतर तिने त्यांना प्रॉफिट टास्कवर जास्त पैसे कमविण्याची संधी असल्याचे सांगून त्यांना टास्कमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ९ लाख ८७ हजार ६२० रुपये ट्रान्स्फर केले होते.
सुरुवातीच्या टास्कवर त्याला कमिशन मिळाले, मात्र नंतर कमिशन मिळणे बंद झाले. याबाबत विचारणा करुन समोरील व्यक्तींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर मालाड पोलिसांनी नेहासह तिच्या इतर सहकार्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक नेत्रा मुळे, गवंडी, गणेश अडसूळ, शेख, महाडिक मोरे, माते या पथकाने तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना एका बँक खात्याची माहिती मिळाली होती. ते बँक खाते अतुल बालचूर याचे नाव समोर आले होते. अतुल हा सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच या पथकाने सुरत येथून अतुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकांचे ३९ एटीएम कार्ड, चेकबुक व आधारकार्ड सापडले.
सुरतच्या चौकशीनंतर पोलिसांनी जयेश प्रजापतीला ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीत फुटबॉल कोचच्या फसवणुकीची रक्कम त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. अतुल हा गरजू लोकांना पैसे देऊन त्यांना बँकेत खाते उघडण्यास सांगत होता. या बँक खात्याची माहिती तो ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना देत होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. याकामी त्याला जयेश प्रजापतीने मदत केली होती. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. फसवणुकीची रक्कम काढण्यासाठी अतुल हा सहलीच्या बहाण्याने दुबईत जात होता. भारतात एटीएममधून २५ हजार रुपये काढता येते, मात्र दुबईतील बँकेतून दिवसातून तुम्ही कितीही रक्कम काढू शकतात. त्याचाच तो फायदा घेत होता. अतुल आतापर्यंत चार वेळा दुबईला गेला असून त्याने विविध एटीएममधून सतरा लाख रुपये काढल्याची कबुली दिली आहे.