फ्लॅट खरेदी-विक्रीसह भाड्याने देण्याच्या आमिषाने गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
बोगस वेबसाईटच्या माध्यमातून गंडा घालणार्या त्रिकुटास अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – फ्लॅट खरेदी-विक्रीसह भाड्याने देण्याच्या बहाण्याने बोगस जाहिरात देऊन ऑनलाईन गंडा घालणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून या टोळीने एका व्यक्तीला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याच्या देण्याच्या नावाने सुमारे २२ लाखांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हौशिला ऊर्फ शिवा शिवकुमार शुक्ला, योगेश दुलेराय करवट आणि विशाल राजनाथ यादव अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी सांगितले.
यातील तक्रारदार कांदिवलीतील रहिवाशी आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना सोशल मिडीयावर मिरारोड येथे हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट उपलब्ध असल्याची एक जाहिरात दिसली होती. त्यात एका मोबाईल क्रमंाक होता. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तो योगेश करवट असून त्यांना तो फ्लॅट त्याच्याच मालकी आहेत. तो फ्लॅट त्याला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले होते. यावेळी त्याने विशालची एजंट तर शिवकुमारची मेडिएटर म्हणून ओळख करुन दिली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून या तिघांनी त्यांना मिरारोड, वसई आणि विरार येथील अनेक फ्लॅटचे फोटो व्हॉटअपवर पाठवून दिले होते. त्यामुळे त्यांनी योगेशचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी या तिघांनी त्यांच्याकडून ऑनलाईन २२ लाख ३१ हजार रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ क, ६६ ड आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, प्रभारी पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचांगणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, पोलीस हवालदार नलावडे, सावंत, पावसकर, परब, वसईकर, पोलीस शिपाई हबीब सय्यद यांनी तपास सुर केला होता. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने वसई-नालासोपारा येथून हौशिला शुक्ला, योगेश करवट आणि विशाल यादव या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांना पोलिसांी अटक केली. तपासात या टोळीने ते स्वत फ्लॅटमालक, इस्टेट एजंट असल्याचा बनाव करुन सोशल मिडीयावरील नामांकित वेबसाईटवर फ्लॅट खरेदी-विक्री तसेच भाड्याने देण्याची बोगस जाहिरात देऊन स्वतचे मोबाईल क्रमांक दिले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा विश्वास संपादन करुन ही टोळी त्यांना विविध फ्लॅटचे फोटो व्हॉटअप पाठवून त्यांच्याकडून ऑनलाईन रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करत होते. ही रक्कम त्यांनी विविध बँक खात्यात जमा करुन आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
अशा ऑनलाईन फसवणुकीच्या फसव्या जाहिरातींना सर्वसामान्यांनी बळी न पडता अथवा त्याची योग्य ती शाहनिशा व पडताळणी न करता कोणतेही आर्थिक व्यवहार करुन नयेत. हेव्ही डिपॉझिटसाठी व्यवहार करताना संबंधित व्यक्तींच्या प्रॉपटीची शहानिशा करावी. त्यानंतर त्यांच्याशी व्यवहार करावा असे आवाहन सायबर सेल पोलिसांकडून करण्यात आले आहे.