मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – ऑनलाईन चालणार्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेस पोलिसांनी अटक करुन तिच्या तावडीतून नऊ तरुणींची सुटका केली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. पूनम जितू केदारे असे या ३४ वर्षीय आरोपी महिलेचे नाव असून ती मूळची दिवाची रहिवाशी आहे. मोबाईल संपर्क साधणार्या ग्राहकांसोबत ती तरुणींना शारीरिक संबंधासाठी पाठवित होती, तिने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिच्यविरुद्ध भादवीसह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान बळीत आठही तरुणींना मानखुर्द येथील महिलासुधारगृहात तर अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पूनम ही मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर तिच्या परिचित काही तरुणींना ग्राहकांसोबत विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसासाठी पाठवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने तिला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. मुलुंड येथील एलबीएस मार्ग, मॉडेला चेकनाका परिसरात तडका नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी असून या पार्टीसाठी काही तरुणींची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे बुधवारी पूनम ही आठ तरुणीसह एका अल्पवयीन मुलीसोबत तिथे आली होती. यावेळी ग्राहकासोबत तिचे आर्थिक व्यवहार सुरु असतानाच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या तरुणीसह मुलीची चौकशी केल्यानंतर पूनम ही ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या सांगण्यावरुन त्या सर्वजण ग्राहकासोबत वेश्याव्यवसायासाठी जात असल्याचे सांगितले. या कबुलीनंतर पूनमला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भादवी, पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे.
बळीत आठ तरुणीसह मुलीला नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला आणि बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, पोलीस हवालदार कातकर, वाळे, गाडेकर, पोलीस शिपाई निकम, पारधी, राठोड, खरे, महिला पोलीस हवालदार भाबड, कांबळे, नलावडे, महिला पोलीस शिपाई शेळके, गायकर यांनी केली.