मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्या एका वेश्यादलाल आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. नरेश वरुण यादव असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली असून तिला मानखुर्द येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
नरेश हा साकिनाका येथे राहत असून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवतो. मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर तो शहरातील विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी मुलींना पाठविण्याचे काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने नरेशला संपर्क साधला होता. या ग्राहकाने नरेशला साकिनाका येथील साकीविहार रोडवरील एका हॉटेलमध्ये एका तरुणीला पाठविण्याची विनंती केली होती. त्यांच्यात मोबाईलवरच सर्व आर्थिक व्यवहार झाला होता. हा व्यवहार फायनल झाल्यानंतर नरेशने ग्राहकाला हॉटैलमध्ये तरुणीला पाठविण्याचे आश्वासन दिले होते.
ठरल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी नरेशने तिथे एका तरुणीला पाठविले होते. ही तरुणी रुममध्ये गेल्यानंतर ग्राहकाने तिला तीन हजार रुपयांचे पेमेंट केले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस शिपाई सचिन पुलाते, अहेर, महिला पोलीस शिपाई कांबळे यांनी तिथे छापा टाकून या तरुणीला ताब्यात घेतले. मेडीकलनंतर तिला महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईच्या वेळेस नरेश हा तिथे आला नव्हता. मात्र त्याच्या कॉल डिटेल्सवरुन त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात ही तरुणी एका वेश्यादलालाच्या संपर्कात होती. तोच तिच्याकडे ग्राहक आणून देत होता. गुन्ह्यांच्या दिवशी त्याने नरेशच्या सांगण्यावरुन तिला साकिनाका येथील हॉटेलमध्ये पाठविले होते. अटकेनंतर नरेशला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.