जमिन देतो सांगून व्यावसायिकाची ४९ लाखांची फसवणुक
एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
मुंबई, – पुण्यातील मुळशी परिसरात स्वस्तात जमिन देतो असे सांगून एका व्यावसायिकाकडून घेतलेल्या सुमारे ४९ लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लक्ष्मण निंबाळकर, शंतनु निंबाळकर, अमोल निंबाळकर, लतिका निंबाळकर आणि प्रिया ऊर्फ शनाया निंबाळकर अशी या पाचजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील लक्ष्मणविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे बोलले जाते. या गुन्ह्यांची पोलिसाकडून शहानिशासुरु असल्याचे सांगण्यात आले.
३७ वर्षांचे तक्रारदार इम्मीत गुरुशरण सिंग हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहतात. एप्रिल २०२२ रोजी त्यांना एका वर्तमानपत्रात दापोली, लवासा रोड, पिंपरी-चिंचवड, लोणावळा आणि कर्जत परिसरात जमीन विक्रीसंदर्भात जाहिरात दिसली होती. या जाहिरातीमध्ये एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे त्यांनी दिलेल्या मोबाईल संपर्क साधला असता समोरुन लक्ष्मण निंबाळकर या व्यक्तीने कॉल घेतला होता. त्याने त्याचा नवी मुंबईतील सानपाडा परिसरात कार्यालय असून तेथून ते जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. त्यामुळे त्याने त्यांना कार्यालयात बोलावून सविस्तर चर्चा करु असे सांगितले होते. त्यामुळे इम्मीत सिंग हे त्याच्या कार्यालयात गेले होते. यावेळी लक्ष्मणसोबत तिथे शंतनू, अमोल निंबाळ असे दोघेजण होते. त्यांनी त्यांना पुण्यातील मुळशी, सालतर परिसरात एक जमिन असून जमिनीचे कागदपत्रे दाखविली होती. ही जमीन आवडल्याने त्यांनी ती खरेदी करण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. चर्चेअंती त्यांच्यात जमिनीचा खरेदी-विक्रीचा सौदा २२ लाखांमध्ये झाला होता. त्यापैकी एक लाख रुपये टोकन देऊन त्यांनी ती जमिन बुक केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना साडेतेरा लाख बॅक ट्रान्स्फरने तर दहा लाख कॅश स्वरुपात दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता. मात्र काही दिवसांनी त्यांनी जमिनीबाबत काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगून त्यांना दुसर्या ठिकाणी जमिन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना पुण्यातील मुळशी, पोमगावातील तीन एकर जमिन दाखविली होती. या जमिनीची त्यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केल्यानंतर ती जागा घेण्याचे ठरविले होते.
जानेवारी २०२३ रोजी त्यांनी पुन्हा निंबाळकर कुटुंबियांना दहा लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. जमिनीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांच्या नावावर सात बारा उतारा होईल आणि नंतर ग्रामपंचायतीकडून त्यांना रोड, लाईट आणि पाण्यासाठी परवानगी मिळेल असे सांगण्यात आले. या व्यवहारासाठी त्यांनी त्यांना पुन्हा चार लाख रुपये दिले होते. मार्च २०२३ रोजी त्यांच्यात जमिनीचे रजिस्ट्रेशन झाले होते. ते मराठीत होते. त्यांना मराठी वाचता येत नव्हते. तरीही त्यांनी निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यावर स्वाक्षरी केल्या होत्या. त्यानंतर त्यांना चार दिवसांत रजिस्ट्रेशनची कॉपी मिळेल असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी ती कॉपी दिली नाही. एप्रिल २०२४ रोजी शंतनू आणि अमोल हे त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी त्यांचे वडिल लक्ष्मण निंबाळकर यांना फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे पंधरा लाखांची मागणी केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिा. त्यानंतर ते वडगावात रजिस्ट्रेशनसाठी पेपर आणण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना त्यांच्या नावावर कुठल्याही जमिनीचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते. त्यांच्या नावाने पॉवर ऑफ ऍटनी झाल्याचे समजले. अशा प्रकारे निंबाळकर कुटुंबियांनी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली त्यांच्याकडून पॉवर ऑफ ऍटनीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन त्यांची ४९ लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरसीएफ पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निंबाळकर कुटुंबियांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसाकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.