कचरा वाहून नेणार्या गाडीची बाईकला धडक लागून अपघात
35 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयचा मृत्यू तर चालकास अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – कचरा वाहून नेणार्या गाडीची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात एका 35 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयचा मत्यू झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. अजीम जमीनउल शेख असे अपघातात मृत्यू झालेल्या डिलीव्हरी बॉयचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी प्रकाश ननकू यादव या चालकास ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हा अपघात मंगळवारी रात्री उशिरा एक वाजता अंधेरीतील वालावलकर गार्डनजवळील मशिद अल सलाम चौकासमोर झाला. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. मशिद अल सलाम चौकाजवळ येताच तिथे पोलिसांना प्रचंड गर्दी दिसली. तिथे जाऊन पाहणी केल्यानंतर एका अॅक्टिव्हा बाईकला महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणार्या मिनी कॉम्पॅक्टर गाडीने धडक दिल्याचे दिसून आले.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासादरम्यान त्याचे नाव अजीम शेख असून तो गोरेगाव येथील ग्रीनलॅण्ड हायस्कूलसमोरील शहीद भगतसिंगनगरचा रहिवाशी आहे. सध्यातो एका खाजगी कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. रात्री एक वाजता तो मशिद अल सलाम चौकासमोरुन जात होता. यावेळी या वाहनाने त्याला जोरात धडक दिली होती, चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी चालक प्रकाश ननकू यादव याला अटक केली होती. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. अजीमच्या अपघाती मृत्यूने त्याच्या शहिद भगतसिंग नगरातील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.