स्वस्तात व्यावसायिक गाळा देतो सांगून महिलेची फसवणुक
७५ लाखांच्या अपहारासह फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – जोगेश्वरी येथे सिटी होम कंपनीकडून बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये स्वस्तात व्यावसायिक गाळा देतो असे सांगून एका ४० वर्षांच्या महिलेची दोन ठगांनी सुमारे ७५ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अरुण करवा आणि इम्तियाज उमर कुरेशी या दोन्ही ठगाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
गोरेगाव येथील बांगुरनगर, वसंत गॅलेक्सीच्या पोलरीस टॉवरमध्ये रिना सोनू गुप्ता ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे तिने एक व्यावसायिक गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तिथे स्वतचा व्यवसाय करायचा किंवा गाळा भाड्याने द्यायचा असा तिचा विचार होता. त्यामुळे तिचे व्यावसायिक गाळा खरेदीसाठीचे प्रयत्न सुरु होते. दहा वर्षांपूर्वी तिची अरुण करवा आणि इम्तियाज कुरेशीशी ओळख झाली होती. या दोघांनी तिला सिटी होम कंपनीकडून जोगेश्वरीतील ओशिवरा, रहिमाबाद सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या सोसायटीमध्ये काही व्यावसायिक गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी २०० चौ. फुटाचा एक व्यावसायिक गाळा तिला स्वस्ता मिळवून देतो असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने तिथेच गाळा खरेदीचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या कालावधीत तिने त्यांना कॅश आणि चेकद्वारे सुमारे ७५ लाख रुपयांचे पेमेंट केले होते त्यानंतर त्यांनी तिला प्रोव्हिजनल ऍलोटमेंट लेटर दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत गाळ्याचा ताबा दिला नाही. याबाबत वारंवार विचारणा करुनही ते दोघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा व्यवहार संशयास्पद वाटताच तिने दोन्ही आरोपींकडे गाळ्यासाठी दिलेल्या ७५ लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी तिला पैसे परत केले नाही. स्वस्तात व्यावसायिक गाळा देतो असे सांगून या दोघांनी तिच्याकडून घेतलेल्या गाळ्यासाठी घेतलेल्या ७५ लाखांचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. या घटनेनंतर तिने पोलीस उपायुक्त कार्यालयात दोन्ही आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रिना गुप्ता हिची पोलिसांनी जबानी नोंदवून अरुण करवा आणि इम्तियाज कुरेशी या दोघांविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमातर्ंगत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.