मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – रायगड येथे साडेसोळा कोटीच्या प्रॉपटीमध्ये गुंतवणुक केल्यास पाच व्यावसायिक गाळा देण्याची बतावणी करुन अंधेरीतील एका स्टिल व्यापार्याची १ कोटी ३८ लाखांची फसवणुक कटातील एका मुख्य आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. रोशनअली शहा असे या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील इव्हरनेस्ट इन्फ्रा ट्रेंड कंपनीचा मालक आहे. या कंपनीचा दुसरा पार्टनर महादेवा खिमा दुबरिया हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत रोशनअली पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
गोकुळ गेला पांचपाया हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला मार्केट परिसरात राहतात. तिथेच त्यांचा स्टिल भांड्याचा विक्रीचे एक दुकान आहे. जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या परिचित महादेवा दुबरिया हे त्याचा मित्र रोशनअलीसोबत त्यांच्या दुकानात आला होता. या दोघांची नवी मुंबईत इव्हरनेस्ट इन्फ्रा ट्रेड नावाची एक कंपनी असून त्यात ते दोघेही पार्टनर आहे. त्यांच्या कंपनीकडे रायगड येथे साडेसोळा कोटीची एक प्रॉपटी असून त्यात त्यांनी गुंतवणुक करावी. त्यामोबदल्यात त्यांनी त्यांना पाच व्यावसायिक गाळे देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रॉपटीवर लवकरच बांधकाम सुरु असून सहा महिन्यांत त्यांना गाळ्याचा ताबा मिळेल असे सांगितले. यावेळी त्यांनी प्रॉपटीच्या कागदपत्रांची पाहणी केली होती. त्यात तिथे दोन इमारती असून एक शॉपिंग सेंटर होते. सहा महिन्यांत गाळ्याचा ताबा मिळाला नाहीतर त्यांना त्यांची गुंतवणुक रक्कम व्याजासहीत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी रोशनअली आणि महादेवा यांच्यावर विश्वास ठेवून जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत टप्याटप्याने १ कोटी ३८ लाख रुपयांचे पेमेंट केले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना गाळ्यांचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. विविध कारण सांगून त्यांच्याकडून आणखीन काही दिवसांची मुदत मागत होते. गेल्या तीन वर्षांत त्यांच्याकडून गाळ्याचा ताबा मिळाला नाही तसेच पैशांची मागणी केल्यानंतर व्याजासहीत गुंतवणुक केलेली रक्कम परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी या दोघांविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रोशनअली शहा आणि महादेवा दुबरिया या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. या दोघांचा शोध सुरु असताना रोशनअलीला अखेर तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत महादेवा दुबरिया याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.