क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने व्यावसायिक महिलेची फसवणुक

दुबईला जाणार्‍या आरोपी कोरोग्राफरला विमानतळावर अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – क्रिप्टो करन्सीवर गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून एका इमिग्रेशन व्यावसायिक महिलेची सुमारे २० लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी जयकुमार नायर या कोरोग्राफरला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या जयकुमारविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजाविली होती. मंगळवारी तो दुबईला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ओशिवरा पोलिसांच्या स्वाधीन केले.

दिप्ती सुरेंद्रकुमार असीजा ही महिला अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहत असून तिचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. मे २०२२ रोजी तिची दलाल म्हणून काम करणार्‍या जयकुमारशी ओळख झाली होती. तो सांताक्रुज येथील कालिना, मथुरादास कॉलनीत राहत होता. त्याने तिला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देता या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळवून देतो असे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत जयकुमारला वीस लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. या गुंतवणुकीवर तो तिला सहा लाखांवर सात तर उर्वरित चौदा लाखांवर पाच टक्के व्याजाची रक्कम देणार होता. ठरल्याप्रमाणे त्याने तिला काही महिने व्याजाची रक्कम देत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याने तिला कुठलाही परतावा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याच्याविषयी चौकशी सुरु केली होती. यावेळी तिला जयकुमारचा क्रिप्टो करन्सीचा कुठलाही व्यवसाय नाही. त्याने दिप्तीसह अनेकांना त्याचा क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय असून त्यात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगत होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने त्याच्याकडे गुंतवणुकीच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने गुंतवणुकीची रक्कम तिला परत केली नाही. त्यामुळे तिने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना सांगून जयकुमार याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता.

चौकशीदरम्यान जयकुमार हा कोरोग्राफर असून त्याने डान्स इंडिया डान्स या रिअलिटी शोमध्ये भाग घेतला होता. पहिल्या सीझनच्या अंतिम फेरीत तो गेला होता. तो देश-विदेशात शोसाठ जात असल्याने त्याच्या अटकेसाठी ओशिवरा पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. मंगळवारी जयकुमार हा दुबईला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस असल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अटकेची माहिती नंतर ओशिवरा पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी तिथे जाऊन जयकुमारला ताब्यात घेतले होते. फसवणुकीच्या या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page