मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – अंधेरी येथे एअर गन फायरिंगमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एअर गनने प्रॅक्टिस करताना चुकून गोळी फायर होऊन आयटीसी कंपनीच्या महाव्यवस्थापकाच्या फ्लॅटच्या खिडकीच्या काचेला ही गोळी लागली होती. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फायरिंग करणार्या तरुणाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या या तरुणाला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा पावणेतीन वाजता अंधेरीतील ओशिवरा, इंद्रदर्शन-दोन, इमारत क्रमांक तेरामध्ये घडली. याच इमारतीच्या नवव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०५ मध्ये करण रमन सहगल हे त्यांच्या पत्नी रितिका आणि पाच वर्षांची मुलगी सोया यांच्यासोबत राहतात. हा फ्लॅट शशिधर सिन्हा आणि ईना सिन्हा यांच्या मालकीचा असून ते तिथे गेल्या अठरा महिन्यांपासून वास्तव्यास आहे. ते आयटीसी लिमिटेड कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून कामाला असून या कंपनीचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे आहे. त्यांची पत्नी रितिका ही अंधेरीतील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते. ९ फेब्रुवारी ते कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. १४ फेब्रुवारीला रात्री उशिरा ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी बेडरुममध्ये झोपल्या होत्या.
रात्री पावणेतीन वाजता ते मोबाईल पाहत होते. यावेळी त्यांना अचानक मोठा आवाज आला. त्यामुळे ते बाहेर आले असता त्यांना समोरील इमारतीमधून कोणीतरी त्यांच्या खिडकीच्या काचेवर फायर केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या खिडकीचे नुकसान झाले होते. तिथे त्यांना दोन एम एम आकाराचे एक चांदीच्या रंगाचा छरा दिसला. तसेच खिडकीच्या प्लॅटफॉर्मवर काचेचे बारीक तुकडे पडल्याचे दिसून आले. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले होते. त्यांनी खिडकीतून समोरील इमारतीची पाहणी केली असता तिथे तीन ते चार तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसून आले. त्या रुमची लाईट सुरु होती.
याच रुममधून बंदुकीने ती गोळी फायर होऊन त्यांच्या खिडकीच्या काचेवर लागली होती. या घटनेनंतर त्यांनी ओशिवरा पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सविस्तर पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी समोरील इमारतीमध्ये राहणार्या चारही संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्राथमिक तपासात यातील एक तरुण त्याच्या घरात एअर गनने गोळीबाराची प्रॅक्टिस करत असल्याचे दिसून आले. त्याने चुकून फायर केलेली एक गोळी त्यांच्या खिडकीच्या काचेला लागली आणि त्यात खिडकीसह काच फुटून सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले होते.
याप्रकरणी करण सहगल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फायरिंग करणार्या तरुणाविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला चौकशी करुन नोटीस देऊन सोडून देण्यात आले. रात्री उशिरा झालेल्या फायरिंगच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.