२५ लाखांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने तक्रारदारांना परत केले

वसईहून जोगेश्‍वरीला येताना कारमध्ये दागिन्यांची बॅग विसरले होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – वसईहून जोगेश्‍वरीला नातेवाईकांना येताना कारमध्ये विसरलेले सोन्याच्या दागिन्यांची बॅग ओशिवरा पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिली. सुमारे २५ लाखांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने परत मिळाल्याने तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबियांनी ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील व त्यांच्या पथकाचे आभार व्यक्त केले आहे. या कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

व्यवसायाने व्यापारी असलेले नजीरुल याकूब हसन हे वसईतील रश्मी कॉम्प्लेक्स, बंगला क्रमांक ४५ चे रहिवाशी आहेत. त्यांचे नातेवाईक सय्यद हातीब हे जोगेश्‍वरीतील आदर्शनगर परिसरात राहतात. शुक्रवारी ९ ऑगस्टला ते वसई येथून त्यांच्या कुटुंबियांसोबत जोगेश्‍वरीतील नातेवाईकाकडे येण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी उबेरची एक कार बुक केली होती. सामानासोबत त्यांनी २५ लाखांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने आणले होते. जुबेर वाईन शॉपजवळ कारमधून उतरल्यानंतर ते नातेवाईकाकडे घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी म्हणजे १० ऑगस्टला त्यांना त्यांची सोन्याची दागिने असलेली बॅग दिसली नाही. त्यांनी सर्वत्र बॅग शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना बॅग कुठेच सापडली नाही. यावेळी त्यांना बॅग कारमध्ये विसरल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून ही बॅग शोधून देण्याची विनंती केली होती. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खैरे, पोलीस हवालदार पवार, भंडारे, जगदाळे, चव्हाण, शेरे, पोलीस शिपाई नागरे, पाटील यांनी कारचालकाचा शोध सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर तक्रारदारांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग कारमध्ये विसरल्याचे उघडकीस आले होते. कारचा क्रमांक प्राप्त करुन पोलिसांनी उल्हासनगरला राहणारा चालक शंकर बन्शी शिंदे याला संपर्क साधला. यावेळी त्याने उडवाडवीचे उत्तरे देऊन बॅग त्याच्या बॅगेत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पोलिसांचे कॉल घेतले नाही. सोमवारी १२ ऑगस्टला पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधला असता तिने ती बॅग तिच्याकडे असल्याचे सांगितले. त्यांनतर पोलीस पथक उल्हासनगर येथे गेले आणि त्यांनी शंकर शिंदे याच्या घरातून ही बॅग ताब्यात घेतली. दागिने असलेली बॅग नंतर तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आली. १० ऑगस्टला तक्रार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ओशिवरा पोलिसांनी कारचालकाचा शोध घेऊन सुमारे २५ लाखांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने परत मिळवून तक्रारदारांना परत केले, त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी ओशिवरा पोलिसांचे आभार व्यक्त मानले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page