सिगारेट विक्रेत्याला फरफरत नेणार्‍या महिलेसह पाचजणांना अटक

पाचही आरोपींची शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मार्च 2026
मुंबई, – सिगारेटचे 870 रुपये मागितले म्हणून सिगारेट विक्रेत्याला कारमधून शंभर मीटर फरफटत नेणार्‍या एका महिलेसह पाचजणांना ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. प्रियांशू जमुनाधर उपाध्याय, सुरजकुमार बृश्यम द्विवेदी, तरुणणूम जावेद सय्यद, बिलाल अब्बास रिझवी आणि अहमद अखिल मोहम्मद अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने शनिवार 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मिडीयावर हा प्रकार व्हायरल होताच या पाचही आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते.

यातील तक्रारदार जोगेश्वरी येथे राहत असून रात्रीच्या वेळेस रस्त्यावर सिगारेट विक्रीचे काम करतो. मंगळवारी पहाटे चार वाजता तो जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, लकी बिर्याणी हॉटेलजवळ सिगारेट विक्री करत होता. याच दरम्यान तिथे पांढर्‍या रंगाची व्हॅगनार कार आली. या कारमध्ये एका महिलेसह तीन पुरुष होते. त्यांनी त्याच्याकडून 870 रुपयांचे सिगारेट घेतले, यावेळी त्याने त्यांच्याकडे सिगारेटचे पैसे मागितले होते, मात्र त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार देत त्याच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारमधील महिलेने त्याचे कॉलर पकडले तर दुसर्‍याने त्याला बेदम मारहाण केली.

त्याचा हात पकल्यानंतर कारचालकाने भरवेगात कार चालविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला शंभर मीटर फरफटत नेण्यात आले होते. यावेळी त्याच्या जिवाला धोका असल्याचे माहित असताना त्यांनी त्याला फरफटत नेले होते. हा प्रकार काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर शूट केला होता. काही वेळात हा व्हिडीओ संपूर्ण सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. ही माहिती प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी संबंधित कारचालकासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या व्हिडीओची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित सर्व आरोपीविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश ओशिवरा पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कदम, पोलीस उपनिरीक्षक बाबू कोटरे, पोलीस हवालदार सिराज मुजावर, पोलीस शिपाई अमोल सुतार, गणेश बोर्‍हाडे, सागर आवडे, शरद कोळेकर या पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना प्रियांशू उपाध्याय, सुरजकुमार द्विवेदी, तरणणूम सय्यद, बिलाल रिझवी आणि अहमद मोहम्मद या पाचही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page