अश्‍लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन महिलेची बदनामी

हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला म्हणून बदनामीचा केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शारीरिक संबंधाचे अश्‍लील फोटोसह व्हिडीओ पतीसह नातेवाईकांना व्हायरल करुन एका विवाहीत महिलेची विनयभंग करुन बदनामी झाल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सौरभ शंभूनाथ जैस्वाल या प्रियकराविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला म्हणून सौरभने तक्रारदार महिलेची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२६ वर्षांची तक्रारदार महिला जोगेश्‍वरीतील आनंदनगर परिसरात राहत असून तिच्या पतीचा कांद्याचा व्यवसाय आहे. तिच्या पतीला मदतनीस म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून सौरभ हा काम करत होता. त्यामुळे तो कामानिमित्त तिच्या पतीसोबत नेहमी त्यांच्या घरी येत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. २५ मार्चला सायंकाळी सौरभ हा तिच्या घरी आला होता. बोलताना त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान त्यांच्यात दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध आले होते. यावेळी त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे मोबाईलवरुन फोटो आणि व्हिडीओ बनविले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला फोटो आणि व्हिडीओ नंतर डिलीट करणयाचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे तिनेही त्याकडे दुर्लक्ष केले होते.

मे २०२४ रोजी ते दोघेही जोगेश्‍वरीतील एका हॉटेलमध्ये भेटले होते. तिथेही त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यावेळेसही त्याने त्यांच्यातील अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ बनविले होते. या घटनेनंतर तो तिला सतत संबंधित हॉटेलमध्ये बोलवत होता, मात्र तिने हॉटेलमध्ये जाण्यास नकार देत त्याला प्रतिसाद देणे बंद केले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने तिला तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. मात्र त्याकडे तिने विशेष लक्ष दिले नाही. १६ ऑगस्टला त्याने तिच्या पतीला त्यांच्यातील शारीरीक संबंधाचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ पाठविले होते. या प्रकारानंतर तिच्या पतीने तिला जाब विचारला होता. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला.

याच दरम्यान सौरभने तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या इतर काही नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करुन विनयभंग केला होता. तिची बदनामीचे सत्र सुरुच ठेवले होते. तिच्या पतीला सतत कॉल आणि मॅसेज करुन तिच्याविषयी भडकावत होता. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सौरभविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याची पोलिसाकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page