व्हिला बुकींगच्या नावाने ऑनलाईन फसवणुक

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुण्यातून अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – कर्जत आणि लोणावळा येथे सुट्टीनिमित्त येणार्‍या पर्यटकांना व्हिला बुकींगच्या नावाने ऑनलाईन गंडा घालणार्‍या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने पुण्यातून अटक केली. आकाश रुपकुमार जाधवानी असे या 25 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आकाश हा सराईत गुन्हेगार असून व्हिला बुकींगच्या नावाने त्याने अनेक गुन्हे केले असून याच गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती, मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा फसवणुकीचा धंदा सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यमन सुरेश चटवाल हे अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात. जानेवारी महिन्यांत सुट्टीनिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत खोपोली किंवा लोणावळा येथे फिरायला जायचे होते. त्यामुळे त्यांनी सोशल मिडीयावर व्हिला बुकींगसाठी सर्च केले होते. त्यात त्यांना एका व्हिलाची माहिती दिसली होती. या पेजवर एका व्हिलाची माहिती देताना त्यात साडेचौदा हजार फॉलोअर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी या पेजवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने व्हिला उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर यमन चटवाल यांनी अठरा व्यक्तीसाठी तीन दिवसांसाठी व्हिला बुक केला होात. त्यासाठी त्यांना 85 हजार रुपये सांगण्यात आले. त्यापैकी 42 हजार 500 रुपये त्यांनी संबंधित व्यक्तीला ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्यांनी संबंधित वेबपेजची पाहणी केली असता त्यात त्यांना चांगली प्रतिक्रिया नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल करुन व्हिला बुकींग रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती, मात्र त्याने पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. आरोपीच्या मोबाईलसह ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्याची माहिती काढून पोलीस निरीक्षक विजय माडये, प्रशांत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत, स्वप्निल काकडे यांनी तांत्रिक माहितीवरुन पुण्यातील खरडी, चोखी धाणी परिसरातून आकाश जाधवानी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता.

चौकशीत आकाश हा घाटकोपर येथील पंतनगर, कर्म विहारचा रहिवाशी आहे. व्हिला बुकींगच्या नावाने त्याने आतापर्यंत अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध ओशिवरा, मलबार हिल, विलेपार्ले, एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा अशा प्रकारे फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, सिमकार्ड, बँकेचे डेबीट कार्ड, आधार व पॅनकार्ड जप्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page