डिलीव्हरीच्या 69 लाखांच्या हिरेजडीत दागिन्यांसह कॅशचा अपहार

शिल्पी ज्वेलर्सच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – डिलीव्हरीसाठी दिलेल्या सुमारे 69 लाखांच्या हिर्‍यांच्या दागिन्यांसह कॅशचा अपहार करुन शिल्पी ज्वेलर्सचा कर्मचारी निखील अरुण गेहलोत हा पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निखिलविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. तो त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने ओशिवरा पोलिसांची एक टिम राजस्थानला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महिपालसिंग डुंगरसिंग बडगोता हे मूळचे राजस्थानचे रहिवाशी असून सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहतात. अंधेरीतील शिल्पी ज्वेलर्स शॉपमध्ये ते गेल्या सहा वर्षांपासून सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहेत. त्यांच्या कंपनीशी सलग्न असलेली रुल्स डायमंड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक शॉप झव्हेरी बाजार परिसरात आहे. त्यांच्या शॉपमधून झव्हेरी बाजार येथील शॉपमध्ये हिरेजडीत व सोन्याचे दागिने तसेच कॅश ने-आण करण्यासाठी निखिल गेहलोत हा कामाला होता. निखील हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून सध्या कांदिवली परिसरात राहतो. मंगळवारी 25 मार्चला त्याला महिपालसिंग बडगोता यांनी 54 लाख 25 हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे नेकलेस, बांगड्या, सलिटर रिंग आणि पंधरा लाखांची कॅश असा 69 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल झव्हेरी बाजार येथील कार्यालयात डिलीव्हरीसाठी दिले होते. त्यामुळे दुपारी दोन वाजता तो अंधेरीतील शॉपमधून झव्हेरी बाजार येथे जाण्यासाठी निघाला.

मात्र बराच वेळ होऊन तो रुल्स डायमंड प्रायव्हेट लिमिटेड या शॉपमध्ये गेला नव्हता. विचारणा केल्यानंतर तो तिथे आलाच नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच महिपालसिंग बडगोता यांनी निखिलला संपर्क साधला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद होता. दुसर्‍या दिवशी त्यांनी पुन्हा निखिलला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल दुसर्‍या दिवशीही बंद येत होता. निखील हा हिरेजडीत दागिने आणि कॅश असा 69 लाखांचा मुद्देमाल घेऊन पळून गेल्याची खात्री होताच महिपालसिंग यांनी ही माहिती त्यांच्या मालकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी मालकाच्या आदेशावरुन ओशिवरा पोलिसात निखीलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हिरेजडीत दागिन्यांसह कॅशचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. निखिल हा राजस्थानचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम राजस्थानला पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page