मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – ऑनलाईन वेबसाईडवर घरातील जुने फर्निचर विक्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. फर्निचर खरेदीच्या नावाने अज्ञात सायबर ठगाने महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारुन तिची सुमारे साडेसहा लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.
जोगेश्वरी येथे एक महिला राहते. त्याना त्याच्या घरातील जुने फर्निचरची विक्री करायचे होते. त्यामुळे त्याने सोमवारी ऑनलाईन साईडवर फर्निचरचे फोटो अपलोड केले. त्यानंतर त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो फर्निचर विकत घेणार असल्याचे भासवले. त्याने फर्निचरची किंमत १५ हजार रुपये ठरवली. ठगाने महिलेला इ वॉलेटवर सुरुवातीला ५०० रुपये पाठवले. खात्यातील रक्कम तपासतो असे सांगून त्याने महिलेला आणखी एक क्यूआर कोड पाठवला. त्या कोड मध्ये पे असे नमूद होते. हा प्रकार महिलेला संशयास्पद वाटल्याने तिने विचारणा केली.
तेव्हा ठगाने सुरुवातीला आपल्या खात्यातून पैसे काढले जातील. त्यानंतर ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने १४ हजार ९९५ रुपये ऑनलाईन पाठवले. काही वेळाने महिलेने ठगाला फोन करून पैशा बाबत विचारणा केली. ठगाने महिलेला पुन्हा एक क्यू आर कोड पाठवला. त्याने महिलेला वारंवार क्यू आर कोड पाठवून तिच्या खात्यातून ६ लाख ४८ हजार रुपये काढले. ठगाने पुन्हा क्यू आर कोड पाठवून महिलेला आणखी १९ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तेव्हा महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.