फ्लॅटचा ताबा देण्यासाठी पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी
स्थानिक गुंड म्हणून परिचित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2025
मुंबई, – एसआरएमध्ये गेलेल्या फ्लॅटचा ताबा देण्यासाठी पंधरा लाखांची खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी स्थानिक गुंड म्हणून परिचित असलेल्या दोघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आसिफ रफिक टोले आणि युनूस रेहमान शेख अशी या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराच्या आई-वडिलांचे दोन फ्लॅट असून एका फ्लॅटचा ताबा आणि चावी देण्यासाठी या दोघांनी खंडणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चालक म्हणून काम करणारा नसीम यासीन शेख हा गोरेगाव परिसरात राहतो. त्याच्या वडिलांच्या मालकीचे जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, मरियम पब्लिक स्कूलमागील मातोश्री चाळीत एक खोली होती. याच घरात तो लहानाचा मोठा झाला होता. मात्र वडिलांसोबत झालेल्या कौटुंबिक वादानंतर तो त्याच्या आईसोबत वेगळा राहू लागला. 2011 रोजी त्यांची जागा एसआरएतंर्गत पुनविकासासाठी गेली होती. यावेळी त्याच्या वडिलांनी नवीन इमारतीमध्ये 605 तर आईला 413 क्रमांकाचा फ्लॅट अलोट झाला होता. सप्टेंबर 2018 साली त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंबिय उत्तरप्रदेशला गेले होते. तिथे सर्व विधी पार पडल्यानंतर ते मुंबईत आले होते. याच दरम्यान त्यांच्या एसआरए इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते.
सर्वांना घराचा ताबा तसेच चावीचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्याच्या आईला घराचा ताबा आणि चावी मिळाली नाही. मार्च 2019 रोजी त्यांना युनूस शेखने फोन करुन फ्लॅटविषयी बोलायचे आहे असे सांगतले. त्यामुळे तो त्याच्या जोगेश्वरीतील बेहरामपाडा परिसरातील कार्यालयात गेला होता. तिथे त्याच्यासोबत आसिफ टोले हा होता. युनूस आणि आसिफ हे परिसरातील स्थानिक गुंड म्हणून परिचित आहे. या दोघांनी त्याला एकाच इमारतीमध्ये पती-पत्नीला फ्लॅट मिळत नाही. फ्लॅटचा ताबा हवा असेल तर त्यांना पंधरा लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम दिल्याशिवाय फ्लॅटचा ताबा मिळणार नाही. तुला कुठे जायचे आहे, कोणाला भेटायचे आहे तर भेटून ये. मात्र पंधरा लाख रुपये दिल्याशिवाय फ्लॅटचा ताबा देणार नाही अशी धमकी दिली होती.
पंधरा लाख देणे शक्य नसल्याने त्याने एसआरएमध्ये तक्रार केली होती. तिथे सुनावणी सुरु असताना या दोघांनी त्याला पुन्हा धमकी देत पंधरा लाखांची मागणी केली होती. या प्रकारानंतर नसीम शेख याने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आसिफ टोले आणि युनूस शेख यांच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.