गुन्ह्यांत अटक न करण्यासाठी २० हजाराची लाचेची मागणी

बोईसर पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
पालघर, – गुन्ह्यांत अटक न करण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजाराची लाचेची मागणी करुन दहा हजाराची लाच स्विकारुन उर्वरित दहापैकी पाच हजाराच्या लाचेच्या रक्कमेसाठी सतत मागणी केल्याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हरेश नावजी ठाकरे याच्याविरुद्ध पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत हरेशची लवकरच संबंधित पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे. लाचप्रकणात गुन्हा दाखल झाल्याने हरेशवर निलंबनाची कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यातील तक्रारदार बोईसरचा रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात ११५, ११८ (१), ३५१ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलीस शिपाई हरेश ठाकरे याने चौकशीसाठी बोलाविले होते. या चौकशीदरम्यान त्याला गुन्ह्यांत अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यांत मदत करण्यासाठी हरेश ठाकरे याने त्याच्याकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. १३ ऑगस्टला त्यापैकी दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम त्याने तात्काळ स्विकारली होती. उर्वरित दहा हजार रुपयांसाठी तो त्याच्याकडे सतत तगादा लावत होता. लाचेची ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर हरेश ठाकरे याच्याविरुद्ध सोमवारी ९ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत हरेशची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सुनिल लोखंडे, पोलीस उपअधिक्षक हर्षल चव्हाण, अप्पर पोलीस अधिक्षक गजाजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page