आठ लाखांची लाच घेताना खाजगी व्यक्तीला अटक
जमिनीचे फेरफार मंजूर करुन सातबारावर नाव नोंदविण्यासाठी लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२४
पालघर, – तलाठीच्या वतीने आठ लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना एका ६२ वर्षांच्या वयोवृद्ध खाजगी व्यक्तीला पालघर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. अशोक दत्तात्रय वरकुटे असे या खाजगी व्यक्तीचे नाव असून या गुन्ह्यांत तलाठी ज्ञानेश्वर देवीदास सिसोदे यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आहे. खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार मंजूर करुन सातबारावर नाव नोंदविण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीच्या मालकांनी शेणवे गाव, सर्व्हे क्रमांक २६७/बी येथे पाच एकर जमिन खरेदी केली आहे. या जमिनीचे फेरफार मंजूर करुन सातबारामध्ये जागा मालकाचे नाव नोंदणीसाठी त्यांनी ठाण्यातील शहापूर, शेणवेच्या तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला होता. मात्र दहा महिने उलटूनही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आली नव्हती. जागा मालकाचे नाव फेरफार करुन सातबारामध्ये नाव नोंदविण्याची प्रक्रिया प्रलंबित होती. त्यामुळे त्यांनी तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान तलाठी कार्यालयात काम करणार्या अशोक वरकुटे याने त्यांचे काम करुन देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी केलीे होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांच्या अर्जावर पुढील कारवाई होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून १६ ऑक्टोंबरला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांनी खाजगी व्यक्ती अशोक वरकुठे यांच्या मार्फत तक्रारदाराच्या फेरफार नेांदणीच्या अर्जामध्ये कुठलीही त्रुटी काढता अर्ज रद्द न करता फेरफार मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी संबंधित कार्यालयात सापळा लावला होता. गुरुवारी ज्ञानेश्वर सिसोदे यांच्या वतीने लाचेची आठ लाख रुपयांचा हप्ता घेताना अशोक वरकुठे याला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. या आठ लाख रुपयांच्या नोटांमध्ये दोन लाख खर्या तर सहा लाख बोगस खेळण्याच्या नोटा होत्या. या गुन्ह्यांत ज्ञानेश्वर सिसोदे यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच या अधिकार्यांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.