रॉयल्टी उल्लघंन कारवाईची धमकी देऊन दोन लाखांच्या लाचेची मागणी
५० हजाराची लाच घेताना दोन पोलीस शिपायासह तिघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
पालघर, – कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या दोन वाहनांवर रॉयल्टी उल्लघंन कारवाईची धमकी देऊन एका व्यावसायिकाकडून दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन ५० हजाराचा लाचेचा हप्ता घेताना दोन पोलीस शिपायासह तिघांना पालघर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. दत्ता माधवराव शिंदे, श्रीराम सूर्यभान डाखुरे आणि तृणाल मोहन धनू अशी या तिघांची नावे आहेत. यातील दत्ता शिंदे बोईसर तर श्रीराम मनोर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सध्या ते दोघेही पालघर येथील जिल्हाधिकारी भरारी पथकात प्रतिनियुक्तीवर आहे. चालक असलेला तृणाल हा खाजगी व्यक्ती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार पालघरचे रहिवाशी असून त्यांचा खडी वाहतूकीचा व्यवसाय आहे. त्यांची भागीदारीत एक खाजगी कंपनीत असून या कंपनीचे काही खाजगी वाहने आहेत. याच वाहनांतून खडी वाहतूक केली जात होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कंपनीच्या वाहनांवर दत्ता शिंदे आणि श्रीराम डाखुरे यांनी कारवाई केलीी होती. त्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी दत्ता शिंदे आणि श्रीराम डाखुरे यांनी त्यांच्या वाहनांवर रॉयल्टी उल्लघंनाची कारवाई व वाहन जप्तीची कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाचेचची मागणी केली होती. प्रत्येक वाहनांमागे त्यांनी एक लाखांची मागणी करुन ही रक्कम दिली नाहीतर त्यांचे दोन्ही वाहने जप्त करण्याची धमकी दिली होती. या दोघांनाही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी १७ फेब्रुवारीला पालघर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची दुसर्या दिवशी म्हणजेच मंगळवार १८ फेब्रुवारीला शहानिशा करण्यात आली होती. यावेळी दत्ता शिंदे आणि श्रीराम डाखुरे यांनी त्यांच्या वाहनांवर रॉयल्टी उल्लघंनाची कारवाई तसेच वाहन जप्तीची कारवाई न करण्यासाठी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी रात्री उशिरा तिथे सापळा लावला होता. रात्री पावणेतीन वाजता त्यांच्या वतीने त्यांचा चालक सहकारी तृणाल धनू यांनी पन्नास हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली होीत. यावेळी तृणाल धनूसह श्रीराम डाखुरे आणि दत्ता शिंदे या तिघांनाही लाचेच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.