फसवणुकीच्या गुन्ह्यांतील व्यापार्याला दिड वर्षांनी अटक
मध्यप्रदेशातील इंदोर शहरात पालघर गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांच्या १.३८ कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड ज्वेलर्स व्यापार्याला पालघर गुन्हे शाखेला दिड वर्षांनी अटक करण्यात अखेर यश आले आहे. कानाराम दलाराम चौधरी असे या व्यापार्याचे नाव असून अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील १७ लाख ७१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. याच गुन्ह्यांत त्याचा पार्टनर व्यापारी हितेश शांतीलाल ढोलकिया याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कानाराम चौधरी आणि हितेश ढोलकिया हे दोघेही ज्वेलर्स व्यापारी असून त्यांनी पालघर येथील सफाळे परिसरात गणेश ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान पार्टनरशीपमध्ये सुरु केले होते. जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत त्यांच्याकडे अनेक ग्राहकांनी नवीन दागिने तसेच जुने दागिने दुरुस्तीसाठी दिले होते. १ कोटी ३८ लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिन्यांसह दागिन्यांचे पैसे मिळताच ते दोघेही दुकान बंद करुन पळून गेले होते. हा प्रकार नंतर संबंधित ग्राहकांच्या लक्षात येताच त्यांनी सफाळे पोलीस ठाण्यात या दोन्ही ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध १० मे २०२३ रोजी पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर हितेश ढोलकीया याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच त्याचा दुसरा पार्टनर कानाराम चौधरी हा पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. तो राजस्थानचा पालीचा रहिवाशी होता, तिथेही पोलीस गेले होते, मात्र तो पोलिसांना सापडला नाही.
त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना कानाराम हा काही महिन्यांपासून मध्यप्रदेशात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल नलावडे, राजेश वाघ, पोलीस हवालदार नरेंद्र पाटील, राकेश पाटील यांनी इंदोर शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या कानाराम चौधरीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हितेशच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पालघर येथे पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. यावेळी त्याच्याकडून गुन्ह्यांतील १७.७१ लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.