प्रेमसंबंधातून प्रेयसीची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

आठ दिवसांनी प्रेयसीची ओळख पटवून तिन्ही मारेकर्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2025
पालघर, – प्रेमसंबंधातून 25 वर्षांच्या नेपाळी प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह वाघ नदीत फेंकून हत्या पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन सहकार्‍यांना पालघर पोलिसांना यश आले आहे. राजकुमार रामबिहारी वरही, सुरेश रामशोभित सिंग आणि बालाजी अशोक वाघमारे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुठलाही पुरावा नष्ट नसताना केवळ आठ दिवसांत मृत प्रेयसीची ओळख पटवून तिची हत्या करणार्‍या तिन्ही मारेकर्‍यांना अटक करणार्‍या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.

1 एप्रिलला सकाळी पावणेअकरा वाजता मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे घाटकर पाडा, जव्हार रोड, वाघ नदीच्या पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. 25 ते 27 वयोगटातील या महिलेचा कापडी स्कार्पने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणीत भरुन ती गोणी नदीत फेंकून अज्ञात मारेकर्‍यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार उघडकीस येताच मोखाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले होते. जप्त केलेल्या गोणीवर एसएम-28 असा मार्क असल्याचे तसेच त्यात वटाणेचा माल आणण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी नाशिक येथून रात्री-अपरात्री भाजीपाल वाहतूक करणार्‍या विक्रेत्यांकडे चौकशी सुरु केली होती.

मृत महिलेचा फोटो दाखवून तिची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. तपासात वटाणाचा माल मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील सिमला येथून येत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे पोलिसांनी काही व्यापार्‍यांची चौकशी सुरु केली होती. या व्यापार्‍यांच्या चौकशीतून सात ते आठ व्यापार्‍यांना मटरच्या गोण्या पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या व्यापार्‍यांची माहिती काढून पोलिसांनी महिलेविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात पोलिसांना यश आले नाही. महिलेची ओळख पटेल अशी कुठलीही माहिती प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे तिचा ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी वापी-सिलवासा परिसरात तिचे फोटो व्हायरल केले होते.

याच दरम्यान तलासरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुनिल माळी यांना मृत महिला तीन दिवसांपूर्वी कासा येथील महालक्ष्मी मंदिरात आली होती. त्यानंतर ती मिसिंग झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मंदिराची सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात ती महिला दिसून आली होती. याच फुटेजमध्ये ही महिला एका स्विफ्ट कारमधून मंदिरात आली होती. त्यानंतर या कारची माहिती काढून पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन राजकुमार वरही, सुरेश सिंग आणि बालाजी वाघमारे या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या तिघांनी या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली होती. मृत महिलेचे नाव काजोल गुप्ता असून ती मूळची नेपाळच्या जनकपूरची रहिवाशी असून सध्या सिलवासा येथे राहत होती. तिचे राजकुमारशी प्रेमसंबंध होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. याच वादातून राजकुमारने तिची हत्या करण्याची योजना बनविली होती. याकामी त्याने सुरेश आणि बालाजी यांची मदत घेतली होती. काजोलला देवदर्शनासाठी जायचे आहे असे सांगून ते तिघेही बालाजीच्या कारमधून डहाणू येथील महालक्ष्मी आणि नंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात आले होते. मोखाडा जंगलात आणल्यानंतर राजकुमारने तिची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह गोणी भरुन ते वाघ नदीजवळ आले. तिथेच मृतदेह असलेली गोणी फेंकून या तिघांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तयानंतर ते तिघेही पळून गेले होते.

यातील राजकुमार हा कटाचा मुख्य आरोपी असून तो नेपाळचा रहिवाशी असून सध्या धनुषा, मुसहरमिया, मुखहरमिया, बहेडा बेलाचा रहिवाशी आहे. सुरेश सिंग सिलवासा तर बालाजी हा धाराशिव, तुळजापूरचा रहिवाशी आहे. हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येचा कुठलाही पुरावा नसताना अवघ्या आठ दिवसांत पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवून तिची हत्या करणार्‍या मुख्य आरोपीसह तिन्ही आरोपींना अटक केली.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांचया मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत, स्वप्नील सावंत देसाई, रविंद्र वानखेडे, सुनिल नलावडे, सहाय्यक फौजदार सुनिल किसन माळी, पोलीस हवालदार दिपक राऊत, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, दिलीप जनाठे, संतोष निकोळे, संजय धांगडा, विजय ठाकूर, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, पोलीस नाईक कल्याण केंगार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page