समाज मंदिरात 70 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या

आईला त्रास दिला म्हणून हत्या केल्याची आरोपीची कबुली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
पालघर, – समाज मंदिरात झोपण्यासाठी गेलेल्या रवु रामचंद्र कामडी या 70 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना पालघरच्या डोंगरीपाडा परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत अंकुश विलास सवरे या 22 वर्षांच्या मारेकर्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली रवु ही महिला अंकुशच्या आईला त्रास देत होती, त्याचा त्याच्या मनात राग होता, याच रागातून त्याने ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विपुल दशरथ धोदडे हा पालघरच्या डोंगरीपाडा, वावे गावचा रहिवाशी आहे. मृत रवु कामडी ही त्याची आत्या आहेत. सोमवारी रात्री रवु ही जवळच्या समाज मंदिरात झोपली होती. यावेळी तिची अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता हत्येचा हा प्रकार उघडकीस येताच विपुल धोदडे याने तारापूर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या रवु हिला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

या घटनेनंतर विपुल धोदडे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी मारेकर्‍याचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन अंकेश सवरे या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच रवु कामडी हिची हत्या केल्याची कबुली दिली. रवु ही तिच्या आईशी सतत भांडण करत होती. तिच्याकडून तिच्या आईला प्रचंड त्रास दिला जात होता. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने रवु हिची तिक्ष्ण हत्याराने हत्या करुन तेथून पलायन केले होते. या गुन्ह्यांचा तपास बोईसर विभागाचे उपविभागीय अधिकारी विकास नाईक हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत, गोरखनाथ राठोड, पोलीस हवालदार विजय ठाकूर, संजय धांगडा, पोलीस नाईक कल्याण केंगार, पोलीस अंमलदार प्रशांत निकम, वैभव जामदार, तारापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कणसे, पोलीस नाईक अंभीरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page