मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
पालघर, – वीज चोरीच्या गुन्ह्यांत सात लाखांची दंडात्मक कारवाई कारवाई न करता गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तसेच वीज जोडणी पुर्नस्थापित करण्यासाठी तीन लाखांची लाचेची मागणी करुन दोन लाखांची लाचेची रक्कम घेताना मराविविक विभागाचे कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड यांना गुरुवारी पालघर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. अतुल आव्हाड यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात लाचेच्या गुन्ह्यांत कारवाई करण्यात आल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार पालघरचे रहिवाशी असून त्यांच्या मालकीचा म्हशीचा तबेला आहे. या तबेलाच्या वीज मीटरव्यक्तिरिक्त त्यांनी एका सर्व्हिस केबलमधून वीज कनेक्शन घेतले होते. अशा प्रकारे त्यांनी विजेची चोरी केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर सात लाखांचा दंडात्मक कारवाई करण्याची धमकी मराविविक विभागाकडून देण्यात आली होती. याच संदर्भात ते कनिष्ठ अभियंता अतुल आव्हाड यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे दंडात्मक कारवाई न करता त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी अतुल आव्हाड यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना दोन लाखांची लाच देण्याची तयारी दर्शवली होती. ही लाच देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांनी गुरुवारी 20 मार्चला पालघर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतुल आव्हाड यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित विभागाकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी अतुल आव्हाड यांनी सात दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करुन दोन लाख रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी संबंधित कार्यालयात सापळा लावला होता.
ठरल्याप्रमाणे तक्रारदार त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी त्यांना लाचेची दोन लाख रुपये दिले होते. लाचेची रक्कम ही घेताना अतुल आव्हाड यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सुहास शिंदे संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस उपअधिक्षक हर्षल चव्हाण, पोलीस हवालदार नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोये, दिपक सुमडा, आकाश लोहरे आणिण पोलीस अंमलदार चालक जितेंद्र गवळी यांनी केली.