मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – पॅनकार्ड अपडेटची बोगस लिंक पाठवून एका व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. अज्ञात सायबर ठगाने पाच ऑनलाईन व्यवहार करुन चार लाख एकोणीस हजाराचा अपहार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पवई पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
५७ वर्षाचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पवई परिसरात राहतात. सोमवारी २६ फेब्रुवारीला त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा मॅसेज आला होता. त्यात त्यांच्या बँकेचे डेबीट कार्ड ब्लॉक झाले असून पॅनकार्ड अपडेटसाठी त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली असता त्यांच्या बँकेचे एक पेज ओपन झाले होते. ती बँकेची अधिकृत वेबसाईट समजून त्यांनी त्यात त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती अपलोड करुन पॅनकार्ड अपडेट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आला होता. त्यामुळे त्यांनी तो ओटीपी क्रमांक वेबसाईटवर टाकला होता. त्यानंतर काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार करुन चार लाख एकोणीस हजार रुपये डेबीट झाले होते. अज्ञात सायबर ठगाने बँकेची हुबेहुब दिसणारी बोगस लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्याचा ऍक्सेस प्राप्त करुन त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या खात्यातून पाच ऑनलाईन व्यवहार करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.