पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज पाठविणार्यास आरोपीस अटक
पुण्यातील भोसरी परिसरात नोडल सायबर सेलची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मे 2025
मुंबई, – राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज पाठवून मानसिक त्रास देणार्या एका 25 वर्षांच्या कॉलेज तरुणाला नोडल सायबर सेल पोलिसांनी पुण्यातील भोसरी परिसरातून अटक केली आहे. अमोल छगनराव काळे असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बीडच्या परळीचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून त्याच्याकडून त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अश्लील मॅसेज पाठविण्यामागे त्याचा उद्देश समजू शकला नसून चौकशीनंतर त्याने मॅसेज का पाठविले होते याचा खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंकजा मुंडे या भाजपाच्या वरिष्ठ नेत्या तसेच राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन अश्लील मॅसेज येत होते. त्यातील काही मॅसेज संदर्भहीन होते. जाणूनबुजून अश्लील आणि संदर्भहीन मॅसेज पाठवून संबंधित अज्ञात व्यक्तीकडून त्यांचा मानसिक शोषण सुरु होता. सुरुवातीला त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र मॅसेजचे प्रमाण वाढू लागल्याने पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना ही माहिती सांगितली होती. या घटनेची या नेत्यांनी गंभीर दखल घेत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातील सोशल मिडीयाचे सहसंचालकांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वतीने नोडल सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर आणि एसडीआर काढल्यानंतर तो मोबाईल क्रमांक पुण्यात अॅक्टिव्ह असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोसरी परिसरातून अमोल काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज पाठविल्याची कबुली दिली. तो बीडच्या परळीचा रहिवाशी आहे. याच मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी यापूर्वी प्रतिनिधीत्व केले होते. अमोल हा सध्या शिक्षण घेत आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याने काही मॅसेज डिलीट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.