मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – विक्रोळीतील पाण्याच्या टाकीत बुडून सचिन जगबहादूर वर्मा या आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी शांतीनगर सहकारी सोसायटीच्या पाच पदाधिकार्यांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात सोसायटीचे अध्यक्ष रामदास बाबूराव शिंगाडे, उपाध्याक्ष तानाजी कुंभार, सचिव रामचंद्र चंद्रजी, उपसचिव गणपती पावले आणि खजिनदार गोपाळ दिपाजी गुरव यांचा समावेश आहे. या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
जगबहादूर शोभाराम वर्मा हे बेगारी कामगार असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर येथील कामराजनगर, बीएमसी शाळेजवळील परिसरात राहतात. सचिन हा त्यांचा आठ वर्षांचा मुलगा असून तो सध्या दुसरीत शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता सचिन हा शाळेतून घरी आला आणि काही वेळानंतर खेळण्यासाठी बाहेर निघून गेला होता. खेळताना तो कामराजनगर, शांतीसागर सोसायटीजवळ गेला होता. यावेळी सोसायटीच्या जुन्या टाकीत तो पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात शांतीसागर सोसायटीच्या आवारात ही पाण्याची टाकी असून सोसायटीने टाकीजवळ संरक्षक भिंत उभी करणे गरजेचे होते. मात्र तिथे संरक्षक भिंत बांधण्यात आली नव्हती. सोसायटीच्या पदाधिकार्यांच्या हलगर्जपणामुळे सचिनचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे जगबहादूर वर्मा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोसायटीच्या पाचही पदाधिकार्यांविरुद्ध हलगर्जीपणामुळे सचिनच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.