सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करुन बदनामीचा प्रयत्न
प्रेयसीच्या तक्रारीवरुन 25 वर्षांच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करुन 21 वर्षांच्या तरुणीचा विनयभंगासह बदनामीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुल नावाच्या एका 25 वर्षांच्या प्रियकर तरुणाविरुद्ध पंतनगर पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
21 वर्षांची तक्रारदार घाटकोपर येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी तिची राहुल या तरुणाशी ओळख झाली होती. तो गुजरातच्या सुरत, दिंडोरी शहराचा रहिवाशी आहे. ओळखीतून मैत्री आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान ते दोघेही एकमेकांना भेटू लागले, अनेकदा राहुल तिला भेटण्यासाठी सुरत येथून येत होता. ते दोघेही महिन्याला किमान चार ते पाच वेळेस भेटत होते. यावेळी त्यांनी त्यांचे काही पर्सनल फोटो काढले होते. ते सर्व त्याच्या मोबाईलमध्ये होते. काही दिवसापूर्वी तिला राहुल हा मद्यप्राशन करत असल्याचे समजले होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यास टाळू लागली होती. त्यातून तो तिला दारुच्या नशेत शिवीगाळ करत होता.
सतत होणार्या भांडणानंतर तिने त्याच्याशी फेब्रुवारी 2025 रोजी ब्रेकअप घेतले होते. तसेच त्याच्याशी बोलणे आणि भेटणे बंद केले होते. त्यामुळे त्याने तिला स्वतच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने पंतनगर पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तरीही तो तिला सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्याला सोशल मिडीयावर ब्लॉक केले होते. ते दोघेही एका अॅपवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. रात्री-अपरात्री तो याच अॅपवरुन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याशी संबंध ठेवले किंवा लग्न केले नाहीतर त्यांच्यातील खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.
इतकेच नव्हे तर त्याने तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयावर अपलोड करुन तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. याबाबत जाब विचारल्यानंतर त्याने ते फोटो डिलीट करुन तिच्यासह तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार पंतनगर पोलिसांना सांगून राहुलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून राहुलची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.