मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 मार्च 2026
मुंबई, – कारची धडक लागून झालेल्या अपघातात अहमद रजा अमीर खान या अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून पळून गेला असून त्याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या कारचालकाचा शोध सुरु केला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता परळ येथील जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाजवळील गेट क्रमांक पाचसमोर झाला.
अमीर कुतब्बोधीन खान हा कुर्ला येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून तो फॅब्रिकेशनचे काम करतो. त्याला फातिमा आणि अहमद रजा नावाचे अनुक्रमे पाच आणि अडीच वर्षांचे दोन मुले आहेत. त्यापैकी फातिमाला दूध पिण्यास, श्वास घेण्याचा त्रास होता. त्यामुळे तिच्यावर नियमित उपचार सुरु होते. 26 फेब्रुवारीला अमीर त्याची पत्नी सना, मुलगा अहमद रजा असे तिघेही फातिमाला घेऊन जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात उपचारासाठी आले होते. यावेळी डॉक्टरांनी फातिमाला तपासून वार्ड क्रमांक अकरामध्ये उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. तिला अॅडमिट केल्याने तिचे आई-वडिल फातिमासोबत रुग्णालयात राहत होते. अहमद रजा हा लहान असल्याने तोदेखील त्यांच्यासोबत तिथे राहत होता.
शुक्रवारी 6 मार्चला सकाळी सव्वादहा वाजता अमीर हा त्याचा नातेवाईक साहिल खान याचे वाट पाहत होते. यावेळी अहमद रजा हा गेट क्रमांक पाचसमोर खेळत होता. याच दरम्यान तेथून जाणार्या एका कारने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर आरोपी कारचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. अहमद रजाच्या तोंडातून, कानातून रक्त येत असल्याने त्यांनी त्याला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त होताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अमीर खान याची पोलिसांची जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका अडीच वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वाडिया रुग्णालयासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपी कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.