मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – वॉलेट चोरीच्या संशयावरुन झालेल्या वादातून बळीराम निरहू चौहाण या ३३ वर्षांच्या हमालाची त्याच्याच मित्राने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्र संगतीराव चव्हाण याला अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत बळीराम आणि आरोपी संगतीराव हे एकमेकांच्या परिचित असून मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शनिवारी दुपारी दिड वाजता विक्रोळीतील पार्कसाईट, लग्नसराई मैदानाकडे जाणार्या रस्त्याजवळील न्यू लुक वाईन शॉपसमोर घडली. रामउग्रह निरहू चौहाण हा विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहत असून मृत बळीराम हा त्याचा मोठा भाऊ आहे. ते दोघेही हमालीचे काम करतात. संगतीराव हा याच परिसरात राहत असून कचरा वेचण्याचे काम करतो. तो बळीरामच्या परिचित आहेत. अनेकदा ते दोघेही रात्रीच्या वेळेस मद्यप्राशन करण्यासाठी बसत होते. काही दिवसांपूर्वी बळीरामचा वॉलेट चोरीस गेला होता. हा वॉलेट संगतीराव यानेच चोरी केल्याच्या संशयावरुन त्याने त्याला दोन ते तीन वेळा बेदम मारहाण केली होती.
शनिवारी दुपारी दिड वाजता ते दोघेही न्यू लूक वाईन शॉपसमोर भेटले होते. यावेळी वॉलेट चोरीच्या वादातून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर बळीरामने त्याला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्याचा राग आल्याने संगतीरावने त्याच्याकडील चाकूने त्याच्या छातीवर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना बळीरामचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्यासह अन्य पोलीस पथकाने धाव घेतली होती.
याप्रकरणी रामउग्रह चौहाण याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्र संगतीराव चव्हाण याला अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीराम हा वॉलेट चोरीच्या संशयावरुन त्याला बेदम मारहाण करत होता. शनिवारीही त्याने याच कारणावरुन मारहाण केली होती. त्याच्या रागातून त्याने त्याच्यावर चाकूने वार केले होते. छातीला गंभीर दुखापत झाल्याने बळीरामचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले.