भूतबाधा घालविण्यासाठी दागिन्यांसह कॅशचा अपहार करुन फसवणुक

अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांत मांत्रिक महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मे 2025
मुंबई, – मानसिक त्रास होणार्‍या भावाच्या पत्नीला भूतबाधा झाली असून भूतबाधा घालविण्यासाठी घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह कॅशचा अपहार करुन एका व्यक्तीची मांत्रिक महिलेने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मेहजबीन रईस खान ऊर्फ हजरतमरियम या महिलेविरुद्ध अपहारासह फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे.

48 वर्षांचे तक्रारदार हे मुलुंडच्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्याच शेजारीच त्यांचा भाऊ त्याच्या पत्नी आणि दोन भावासोबत राहतो. त्याचा भाऊ गेल्या वीस वर्षांपासून तर त्याची पत्नीला दहा वर्षांपासून मानसिक त्रास असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्याच्या पत्नीच्या मानसिक आजरात प्रचंड वाढ झाली होती. अचानक ती जास्त बडबड करत आहे. अधूनमधून हिंदीमध्ये बोलते. अनेकदा तिच्या अंगात येत असल्याने त्याच्या घरची परिस्थिती कठीण झाली होती. त्यामुळे तक्रारदाराच्या भावाने त्याच्या पत्नीला घाटकोपर येथील गॅरेज गल्ली, ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात राहणार्‍या मेहजबीन ऊर्फ हजरतमरियम हिच्याकडे नेले होते. यावेळी तिने त्याच्या पत्नीला पाहून तिला भूतबाधा झाली असून ती भूतबाधा घालविण्यासाठी काही खर्च करावा लागेल असे सांगितले. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या वडिलांनी तिला काही सोन्यासह बकर्‍याचा बळी देण्यासाठी पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर तिने तिच्या हातावर एक धागा बांधला होता.

मात्र त्यातूनही त्यांना काहीच फरक पडला नव्हता. त्यामुळे त्यांचा भाऊ पुन्हा तिच्याकडे गेला होता. यावेळी तिने त्यांच्या सोसायटीजवळ अमीत नावाच्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आईचे त्यांच्यावर कर्ज आहे. त्याचे भूत त्यांना मारुन टाकेन, त्यामुळे त्याच्या आईचे कर्ज फेडून टाक. तरच त्याचा भूत तुम्हाला त्रास देणार नाही असे सांगितले. यावेळी तिने त्यांना घरातील सोने आणण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या वडिलांनी घरातील सोने तिला दिले होते. यावेळी तिने त्यांच्याकडे आणखीन सोन्याची मागणी केली. इतक्या कमी सोन्यातून तिचे कर्ज फेडता येणार नाही. ते दागिने दिले नाहीतर त्याच्या पत्नीला भूत मारुन टाकीन अशी भीती दाखविली होती. तिला आणखीन सोने द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला आणखीन सोन्याचे दागिने आणून दिले होते. अशा प्रकारे गेल्या काही महिन्यांत त्यांच्या भावासह पुतणीने मेहजबीनला सुमारे तीन लाखांचे दागिने आणि कॅश स्वरुपात पंधरा हजार रुपये दिले होते. मात्र तिच्या उपचारातून त्यांना काहीच फरक पडला नाही.

भूतबाधा घालण्यासाठी तिने त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्याचा दागिन्यासह कॅशचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे भावाच्या वतीने तक्रारदाराने घडलेला प्रकार पार्कसाईट पोलिसांना सांगून मेहजबीन खान ऊर्फ हजरतमरियम हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक करणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अधोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. जादूटोणा आणि भूतबाधा घालविण्याचे आश्वासन देऊन तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page