पवई येथे सतरा वर्षांच्या अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – पवई येथे एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीचा मानसिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अतुल नावाच्या एका १९ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३८ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या पती आणि तीन मुलांसोबत पवई परिसरात राहते. तिचा मुलगा सध्या चेन्नई येथे राहत असून तिचे पती खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांची मोठी मुलगी सतरा वर्षांची असून ती एका नामांकित कॉलेजमध्ये अकरावीत शिकते. त्यांच्याच शेजारी राहणार्‍या अतुल या तरुणासोबत तिचे गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती समजताच तिने तिच्या पतीसोबत अतुलला घरी बोलावून योग्य ती समज देऊन त्यांच्यातील प्रेमसंबंध न ठेवण्याची समज दिली होती.

२३ जानेवारीला त्याने तिला फोन केला होता. यावेळी त्याने तिला त्याचे दुसर्‍या मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आहे. तिचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने तिच्यासोबत एक फोटो तिला पाठविला होता. या प्रेमसंबंधाबाबत या मुलीसह इतर कोणालाही काहीही सांगू नकोस. तिने ही बाब कोणालाही सांगितली तरी तो आत्महत्या करेल अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर ती मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली आली होती. तिने हा प्रकार तिच्या परिचित दोन महिलांना सांगून अतुलच्या धमकीबाबत माहिती सांगितली होती. या घटनेनंतर मानसिक नैराश्यातून या मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

तिच्या आत्महत्येनंतर तिच्या मोबाईलमधील इंटाग्राममधील काही मॅसेज तिच्या पालकांनी पाहिले होते. त्यातून हा प्रकार उघडकीस आला होता. अतुलच्या मानसिक त्रासामुळेच तिच्या मुलीने घरात ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अतुलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सतरा वर्षांच्या मुलीचा मानसिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत लवकरच अतुलची पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page