शेअर सर्टिफिकेटसह डिव्हीडंटच्या ९.८४ लाखांचा अपहार

बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बँकेतून कर्ज घेताना सादर करण्यात आलेल्या शेअर सर्टिफिकेटसह डिव्हीडंटच्या कागदपत्रांची बोगस नोंद करुन ९ लाख ८४ हजाराचा अपहार करुन एका व्यावसायिकाची त्यांच्याच बँकेने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बॅकेच्या चार वरिष्ठ अधिकार्‍याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यात जनकल्याण बँकेचे व्यवस्थापक संतोष केळकर, उपसंचालक किशोर बगाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम दाते आणि मुख्य वसुली अधिकारी मोहीश रजक अशी या चोघांची नावे आहेत.

अतुल प्रमोदराय व्यास हे ६९ वर्षांचे वयोवृद्ध घाटकोपर येथे राहत असून त्यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यांची गुजरात येथे न्यू जनेरिक ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी होती. या कंपनीचे विक्रोळीतील एलबीएस मार्गावर एक कार्यालय होते. त्यांच्या कंपनीचे जनकल्याण बँकेत करंट अकाऊंट होते. त्यांनी त्यांच्या कंपनीसाठी बँकेतून तीन वेगवेगळे कर्ज घेतले होते. मात्र वेळेवर कर्जाचे हप्ते भरता न आल्याने बँकेने त्यांच्या कंपनीला नॉन परफॉमिंग असेट म्हणून घोषित केले होते. कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने त्यांच्याकडे काही रिकव्हरी अधिकार्‍यांना पाठविले होते. काही दिवसांनी त्यांनी बँकेने सर्व कर्ज फेडले होते. त्यानंतर बँकेने त्यांना नो ड्यू सर्टिफिकेट दिले होते. कंपनीने तारण ठेवलेले कार्यालय आणि इतर प्रॉपटी, कार्यालयातील शेअर सर्टिफिकेट जामिन मुक्त करुन त्यांनी बँकेचे तिन्ही लोन अकाऊंट बंद केले होते. लोन घेताना त्यांनी बँकेचे ९ लाख ३८ हजार रुपयांचे शेअर घेतले होते. ते शेअर जामिनदार आणि संचालकाच्या नावावर आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेअर सर्टिफिकेटची रक्कम घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कर्जासंदर्भातील सर्व कागदपत्रे सीएकडे पाठविले होते. यावेळी संंबंधित शेअर सर्टिफिकेटवर त्यांना ४६ हजार ९०० रुपयांचे डिव्हीडंट मिळाल्याचे समजले. बँकेच्या कर्जाची रक्कम परतफेड केल्यानंतर बँकेकडून त्यांना शेअर सर्टिफिकेटची ९ लाख ३८ हजार आणि डिव्हीडंटची ४६ हजार ९०० असे ९ लाख ८४ हजार रुपये येणे अपेक्षित होते. मात्र बँकेने त्यांना ही रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी बँकेला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीसला बँकेकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी विक्रोळीतील लोकल कोर्टात बँकेविरुद्ध एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने पार्कसाईट पोलिसांना तपास करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. यावेळी अतुल व्यास यांनी त्यांच्या जनता सहकारी बँकेचे ९ लाख ३८ हजार रुपये शेअर सर्टिफिकेट संबंधित बँकेला दिले होते. कर्जाचे तिन्ही अकाऊंट सेटल झाल्यानतर बँकेच्या संबंधित चारही अधिकार्‍यांनी बोगस नोंदी करुन, त्यांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, त्यांना अंधारात ठेवून शेअरची रक्कम रिडीम करुन त्यांचे अकाऊंट बंद केले. त्यानंतर शेअर सर्टिफिकेट आणि डिव्हीडंटची ९ लाख ८४ हजाराची रक्कम बोगस नोंदी करुन ट्रान्स्फर करुन अतुल व्यास यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच बँकेचे व्यवस्थापक संतोष केळकर, उपसंचालक किशोर बगाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम दाते आणि मुख्य वसुली अधिकारी मोहीश रजक यांच्याविरुद्ध ३१६ (२), ३१८ (४), ३३६ (३), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपीना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page