कुरिअर मध्ये ड्रग पार्सलच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत 

व्यावसायिकाला साडेआठ लाखांना गंडा घातल्याचे उघड

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मे २०२४
मुंबई, – कुरिअर मध्ये ड्रगच्या नावाखाली व्यावसायिकाची साडे आठ लाखांची फसवणूक प्रकरणी एकाला ओशिवरा पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. शिशुपाल शर्मा असे त्याचे नाव आहे. त्याने त्याचे खाते सायबर ठगांना वापरण्यास दिले होते.
तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते कार ने वसई येथे जात होते. बांगूर नगर मेट्रो स्थानक आल्यावर त्याना मोबाईलवर फोन आला. ठगाने तो कुरिअर कंपनीतुन बोलत असल्याचे भासवले. जर कुरिअरची माहिती जाणून घ्यायची असल्यास डायल १ करा असे त्याना सांगितले. त्यानंतर ठगाने तक्रारदार याना नाव व माहिती विचारली. तुमचे मॅरियम नावाने विमानतळावर पार्सल आले आहे. त्यात वस्तू आणि ड्रग असल्याचे सांगितले. कुरिअर मध्ये ड्रग सापडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला  असल्याच्या भूलथापा मारल्या. ठगाने तक्रारदार याना विमानतळावरील सायबर अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितले. त्याने त्याचे नाव प्रदीप सावंत असे सांगून स्काईप आयडीवर जाऊन व्हॉइस कॉल करण्यास सांगितला. कारवाईची भीती दाखवून
ठगाने त्याना त्याच्या साडे आठ लाख रुपये खात्यात जमा करण्यास सांगितले.  पोलीस अधिकारी समोर न येता पैसे कसे ट्रान्स्फर करण्यास सांगू शकतात. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील याच्या पथकातील, पोलीस निरीक्षक सचिन जाधवर, उप निरीक्षक शरद देवरे, पोलीस हवालदार अशोक कोंडे, विक्रम सरनोबत आदी पथकाने तपास सुरु केला.तपासा दरम्यान पोलिसांना बँक खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक राजस्थान येथे गेले. तेथून पोलिसांनी शिशुपालला ताब्यात घेऊन अटक केली. शिशुपालचे औषधाचे दुकान आहे. ठगाने त्याला काही पैसे खात्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिशुपालने त्याचे खाते वापरायला दिले होते. पोलिसांनी तपास करून फसवणूक झालेली रक्कम गोठवली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात शिशुपालला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page